चलनाच्या घसरणीमुळे इराणच्या राजवटीतील मतभेद तीव्र

ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेचा दावा

iran currencyतेहरान – आंतरराष्ट्रीय स्तरातून इराणची झालेली कोंडी आणि गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे इराणचे चलन रियालच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका डॉलरमागे चार लाख, 30 हजार रियाल्स इतकी घसरण झाली. यामुळे भडकलेल्या महागाईचे पडसाद इराणच्या संसदेत उमटू लागले आहेत. आत्तापर्यंत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या सरकारचे समर्थन करणाऱ्या कट्टरपंथीय नेत्यांमध्येच यावरून मतभेदझाल्याचा दावा ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केला.

iran chess player2018 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेऊन नवे निर्बंध जाहीर केले होते. अमेरिकेच्या युरोपिय मित्रदेशांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेचे समर्थन केले नाही. पण तेव्हापासून इराणच्या रियालची सुरू झालेली घसरण थांबलेली नाही. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्याची घोषणा केली. तसेच इराणवरील सर्व निर्बंध मागे घेण्याचे संकेत दिल्यानंतर इराणचे रियाल मजबूत झाला होता.

iran protestपण गेल्या दीड वर्षांपासून अमेरिका व इराणमध्ये या अणुकरारावर वाटाघाटी सुरू असून यातून काही निष्पन्न झालेले नाही. यामुळे इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे उघड होत आहे. याचे परिणाम इराणच्या रियालवर दिसू लागले आहेत. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून इराणमध्ये सरकारच्या विरोधात, हिजाबसक्तीच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांचा परिणामही रियालच्या मुल्यावर झाल्याचा दावा ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केला.

राजवटीविरोधात निदर्शने सुरू झाल्यापासून रियालच्या मुल्यात 20 टक्क्यांची घसरण झाल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इराणच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर अली सालेहबादी यांनी सदर निर्दने आणि अमेरिकेच्या निर्बंधांना जबाबदार धरले होते. काही आठवड्यांपूर्वी सालेहबादी यांनी ही घसरण रोखण्यासाठी काही उपाय केले होते. पण त्यानंतरही इराणच्या मुल्याची घसरण रोखण्यात सालेहबादी अपयशी ठरले असून लवकरच त्यांना पदावरुन हटविले जाणार असल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, रियालच्या या घसरणीमुळे इराणच्या संसदेतील कट्टरपंथी नेते तसेच लष्करातील काही अधिकारी देखील खवळल्याचे सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे समर्थन करणारे हे नेते व लष्करी अधिकारी आता रईसी यांच्यावर टीका करीत असल्याचे या वृत्तसंस्थेने लक्षात आणून दिले.

leave a reply