कोरोना साथीच्या मुद्यावर चीनच्या माध्यमांची स्विस शास्त्रज्ञाच्या नावावर थापेबाजी

- शास्त्रज्ञ अस्तित्त्वातच नसल्याचे स्विस दूतावासाचे स्पष्टीकरण

स्विसबीजिंग/बर्न – कोरोना साथीच्या उगमाची पुन्हा चौकशी करावी, ही भूमिका अमेरिकेच्या दबावामुळे स्वीकारण्यात आली, असा दावा करणाऱ्या चिनी प्रसारमाध्यमांचे पितळ उघडे पडले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी ‘विल्सन एडवर्डस्‌’ नावाच्या स्विस शास्त्रज्ञाच्या वक्तव्यांच्या आधारे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ व अमेरिकेवर हे आरोप केले होते. मात्र प्रत्यक्षात या नावाचा शास्त्रज्ञ अस्तित्त्वातच नसल्याचे स्विस दूतावासाने स्पष्ट केले असून चिनी माध्यमांनी ‘फेक न्यूज’ मागे घ्याव्यात, असे बजावले आहे. या घटनेमुळे कोरोनाच्या साथीबाबत चीनकडून करण्यात येणाऱ्या खोट्या प्रचाराचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे.

गेल्या महिन्यात फेसबुकवर ‘विल्सन एडवर्डस्‌’ नावाच्या प्रोफाईलवर ‘बायोलॉजिस्ट’ असल्याची माहिती प्रसिद्ध करून कोरोनासंदर्भात एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टमध्ये ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या उगमाबाबत पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडण्यात आली होती. त्यात चीनच्या वुहान लॅबची चौकशी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या दबावापोटी घेण्यात आल्याचा दावा केला होता. कोरोनाची चौकशी हा राजकीय डावपेचांचा भाग बनल्याचा ठपका एडवर्डस्‌च्या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

कोरोनाबाबत अमेरिकेवर आरोप करणारी ही पोस्ट चिनी प्रसारमाध्यमांनी तात्काळ उचलून धरली. ‘पीपल्स डेलि’, ‘ग्लोबल टाईम्स’, ‘शांघाय डेलि’, ‘सीजीटीएन’ या माध्यमांनी एडवर्डस्‌च्या पोस्टचा आधार घेऊन अमेरिका व ‘डब्ल्यूएचओ’वर आगपाखड सुरू केली होती. त्याचवेळी चीनची राजवट कोरोनाच्या मुद्यावर कायम पारदर्शी असल्याचे सांगून यासंदर्भात चीनवर होणारे आरोप आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचेही दावे केले. मात्र चीनकडून सुरू झालेला हा नवा प्रचार म्हणजे ‘फेक न्यूज’ असल्याचे काही दिवसातच स्पष्ट झाले. चीनमधील स्विस दूतावासाने 10 ऑगस्टला ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साईटवर विस्तृत निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात ‘विल्सन एडवर्डस्‌’ नावाची कोणतीही व्यक्ती अथवा शास्त्रज्ञ स्वित्झर्लंडमध्ये अस्तित्त्वात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चिनी माध्यमे व नेटिझन्सनी यासंदर्भातील सव पोस्ट मागे घ्याव्यात, असे दूतावासाकडून बजावण्यात आले. त्याचवेळी माध्यमांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असेही सांगण्यात आले. स्विस दूतावासाचे हे निवेदन चिनी माध्यमांसाठी मोठा धक्का ठरला आहे.

या निवेदनानंतर चिनी माध्यमांनी यासंदर्भात इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या पोस्ट मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र या घटनेतून कोरोनाच्या मुद्यावर चीनकडून सुरू असणाऱ्या खोट्या प्रचारमोहिमेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाल्याचे दिसत आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून चीनने त्याबाबत सातत्याने अपारदर्शक व लपवालपवीचे धोरण स्वीकारले होते. सुरुवातीला मानवी संक्रमणाचा मुद्दा नाकारणाऱ्या चीनने कोरोनाचा उगम आपल्याकडे झाला नसून युरोप व इतर आशियाई देशांमधून ही साथ आल्याचे ठोकून दिले होते. त्यानंतर चीनने त्यांच्याकडील साथीची व्याप्ती तसेच लसींच्या संशोधनासंदर्भातील माहितीही लपविली होती.

वुहान लॅबचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐरणीवर आल्यानंतर चीनने अमेरिकेतील प्रयोगशाळांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र हे सर्व खोटे आरोप व दावे करताना चीनने त्यासंदर्भातील एकही पुरावा समोर सादर केलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबत चीनकडून देण्यात येणारी माहिती म्हणजे ‘फेक न्यूज कँपेन’ असल्याचे उघड झाले आहे. स्विस शास्त्रज्ञाची घटना त्याला स्पष्ट दुजोरा देणारी ठरते.

leave a reply