आखाती देशांच्या दौऱ्यावर असताना चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणपेक्षा सौदीला अधिक महत्त्व दिले

- जर्मन अभ्यासगटाचा दावा

सौदीला अधिक महत्त्वबर्लिन/बकिंगहमशायर/एडन – महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखाती देशांचा दौरा केला होता. जिनपिंग यांनी सौदीबरोबर धोरणात्मक सहकार्य करार केला. त्याचबरोबर पर्शियन आखातातील इराणच्या बेटांवर चर्चेचा पर्याय सुचविला. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या उपस्थितीत जीसीसीने इराण हा क्षेत्रीय दहशतवादाचा समर्थक आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा देश असा आरोप केला होता. हे लक्षात घेता चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणपेक्षा सौदीला अधिक महत्त्व दिल्याचे दिसते, असा दावा जर्मन अभ्यासगटाने केला. दरम्यान, चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी येमेनचा दौरा करून सालेह यांच्या सरकारशी चर्चा केल्याची बातमी समोर येत आहे. येमेनमधील सालेह गटाला सौदी व इतर अरब देशांचे समर्थन असल्याचे लक्षात आणून दिले जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आखाती मित्रदेशांना इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. पण सौदी व अरब मित्रदेशांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर अमेरिका व आखाती देशांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दावे केले जात होते. अशा परिस्थितीत, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदीचा दौरा करून राजे सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. यावेळी चीन व सौदीमध्ये धोरणात्मक भागीदारीवर सर्वसमावेशक करार पार पडला तर सौदीच्या नेतृत्वाखाली ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’ या अरब देशांची विशेष बैठकीतही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आखाती देशांच्या भूमिकेचे समर्थन केले. पर्शियन आखातातील तीन बेटांच्या अधिकारावरुन इराण व युएईमध्ये असलेल्या वादाचा यात समावेश होता. याबाबत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी इराणला चर्चेतून हा वाद सोडविण्याचे आवाहन केले. तर जीसीसीने इराणला दहशतवाद आणि शस्त्र तस्करीचा समर्थक देश ठरविल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष जिनपिंग यांनी त्याला विरोध केला नाही, याकडे जर्मन अभ्यासगटाने लक्ष वेधले.

सौदीला अधिक महत्त्वराष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या या भूमिकेवर इराणने संताप व्यक्त करून चीनच्या राजदूताला समन्स बजावले. जीसीसीच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी स्वीकारलेली भूमिका म्हणजे इराणबाबतच्या धोरणात झालेला बदल तर नाही, अशी चिंता इराणमध्ये व्यक्त केली जात आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत जीसीसीने केलेल्या आरोपांनाही जिनपिंग यांनी मूक संमती दिल्याची नाराजी इराणमध्ये व्यक्त केली जात आहे. तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या दौऱ्यात सौदीला महत्त्व देऊन इराणला संकेत दिल्याचे जर्मन अभ्यासगटाचे म्हणणे आहे.

दरम्यान, चीनने शुक्रवारी इराणच्या बंदर अब्बास येथे दूतावास सुरू केला. यामुळे इराणबरोबरचे संबंध सुरळीत आहे, हे दाखविण्याचा चीन प्रयत्न करीत आहे. पण येमेनमधील सौदीचा पाठिंबा असलेल्या सालेह यांच्या सरकारबरोबरील चर्चेसाठी राजनैतिक अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रवाना करून चीन निराळेच इशारे देत आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणचे समर्थन असून या बंडखोरांनी सालेह सरकार व सौदीविरोधात संघर्ष पुकारला आहे.

leave a reply