सुदानमधील गृहयुद्ध सिरिया, येमेन, लिबियातील संघर्षाहून भयंकर असेल

- सुदानच्या माजी पंतप्रधानांचा इशारा

नैरोबी/खार्तूम – ‘सुदानमधील संघर्ष हा लष्कर आणि बंडखोरांमधली छोटी लढाई नाही. तर पूर्णपणे प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज अशा लष्कराच्या दोन तुकड्यांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. येत्या काळात हे गृहयुद्ध शिगेला पोहोचले तर सिरिया, येमेन, लिबियातील संघर्षदेखील याच्यासमोर छोटे ठरतील. हे गृहयुद्ध फक्त सुदानच नाही तर जगासाठी दुःस्वप्न ठरेल’, असा इशारा सुदानचे माजी पंतप्रधान अब्दल्ला हमदोक यांनी दिला.

सुदानमधील गृहयुद्ध सिरिया, येमेन, लिबियातील संघर्षाहून भयंकर असेल - सुदानच्या माजी पंतप्रधानांचा इशारासंयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला संघर्षबंदीचा प्रस्ताव स्वीकारुन सुदानमधील लष्कर आणि निमलष्करीदलाने नवी ७२ तासांची संघर्षबंदी जाहीर केली. पण आधीप्रमाणे ही संघर्षबंदी देखील नाममात्र ठरली असून दोन्ही गटांकडून संघर्षबंदीचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय सुदानमध्ये कामचलाऊ संघर्षबंदी लागू करीत असून यामुळे हा संघर्ष थांबणार नसल्याची टीका होत आहे. अशा परिस्थितीत सुदानचे माजी पंतप्रधान अब्दल्ला हमदोक यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाश्चिमात्य देशांना इशारा दिला.

‘दोन लष्करामध्ये सुरू असलेले हे निरर्थक युद्ध आहे. या युद्धातून कुणीही विजयी होणार नाही. म्हणूनच हे युद्ध रोखायला हवे. अन्यथा सुदानमधील गृहयुद्ध जगासाठी भयंकर दुःस्वप्न ठरेल. याचे विदारक परिणाम संभवतील’, असा इशारा हमदोक यांनी दिला. या गृहयुद्धाच्या परिणामांबाबत बोलताना माजी पंतप्रधानांनी सिरिया, येमेन आणि लिबियातील संघर्षाची तुलना केली. आखाती देशांमधील संघर्षापेक्षाही सुदानमधील गृहयुद्ध अतिशय भयानक ठरेल, असे हमदोक यांनी बजावले.

सुदानमधील गृहयुद्ध सिरिया, येमेन, लिबियातील संघर्षाहून भयंकर असेल - सुदानच्या माजी पंतप्रधानांचा इशारागेल्या १८ दिवसांपासून सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात ५५० हून अधिक जणांचा बळी गेला असून पाच हजार जण जखमी झाले आहेत. या संघर्षात चार लाख, ३० हजाराहून अधिक जण विस्थापित झाले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. यातल्या एक लाख सुदानींनी शेजारी देशांमध्ये धाव घेतल्याचे राष्ट्रसंघाने सांगितले. हा संघर्ष वेळीच रोखला नाही तर आठ लाख जण विस्थापित होतील, असा इशाराही राष्ट्रसंघाने दिला.

दरम्यान, सुदानमधील लष्कर व निमलष्करीदलामधील संघर्षावर साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झालेले असताना, येथील जैविक प्रयोगशाळांच्या सुरक्षेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने नव्याने चिंता व्यक्त केली. राजधानी खार्तूममधील प्रयोगशाळेतील विषाणू संसर्गजन्य असून सशस्त्रदलांनी या प्रयोगशाळेचा घेतलेला ताबा नक्कीच चिंता वाढविणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने बजावले आहे.

हिंदी

 

leave a reply