गोव्यामध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची बैठक सुरू

बाणावली – गोव्यामध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीदरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव तसेच चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत दोन्ही देशांमधील प्रलंबित मुद्दे व सीमेवर शांती आणि सौहार्द प्रस्थापित करण्यावर सखोल चर्चा पार पडल्याचे सूचक विधान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केले. तर चीनचे परराष्ट्रमंत्री एससीओच्या या बैठकीनंतर पाकिस्तानचा दौरा करून भारताबाबतचा असंतोष प्रदर्शित करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

गोव्यामध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची बैठक सुरूरशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबरील चर्चेत द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. भारताला एससीओचे सदस्यत्त्व मिळावे, यासाठी रशियाने केलेल्या प्रयत्नांकरिता परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आभार मानले. तर एससीओच्या काऊन्सिल ऑफ फॉरिन मिस्टर झँग मिंग यांच्याशीही आपली फलदायी चर्चा झाल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जाहीर केले. तसेच उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियार सैदोव यांच्याशीही जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चा केली.

दरम्यान, या बैठकीसाठी भारतात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो-झरदारी यांच्याशी जयशंकर यांची द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. शुक्रवारी देखील भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा अपेक्षित नाही. भारताने आधीच ही शक्यता निकालात काढली होती. पाकिस्तानने अजूनही दहशतवाद सोडून दिलेला नाही, त्यामुळे या देशाशी चर्चा शक्य नसल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जाहीर केले होते. त्यावर पाकिस्तानातील काही विश्लेषकांनी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी ही उत्तम संधी होती. पण भारताने त्याला नकार दिला आहे. यामुळे दोन्ही देशांचे संबंध पुढच्या काळातही ताणलेलेच असतील, अशी खंत पाकिस्तानचे हे विश्लेषक व्यक्त करीत आहेत. गोव्यामध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची बैठक सुरूतर काहीजणांनी भारताने स्वीकारलेल्या या कठोर भूमिकेला पाकिस्तानचे नेतेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

काही आठवड्यांपूर्वी, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या नेतृत्त्वावर आक्षेपार्ह टीका केली होती. यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानबरोबर चर्चेचा निर्णय घेणे शक्यच नव्हते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांना राजनैतिक समज व अनुभव नसल्याने त्यांनी अशी टीका करून भारताशी चर्चेची शक्यताच निकालात काढली, असे पाकिस्तानची माध्यमे सांगत आहेत.

चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांच्याबरोबर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चा केली असली, तरी एलएसीवरील तणावाचा मुद्दा भारताने सोडून दिलेला नाही, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली आहे. सोशल मीडियावरून जयशंकर यांनी सदर चर्चेबाबत दिलेली माहिती याची साक्ष देत आहे. यामुळेच चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एससीओच्या या बैठकीनंतर पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी तसे दावे केले आहेत. याद्वारे चीन आपला असंतोष व्यक्त करीत असल्याचे दिसते. मात्र भारतातून यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

हिंदी

 

leave a reply