रशियाने लिबियात एस-४०० तैनात केल्याचे दावे

त्रिपोली – लिबियातील गृहयुद्धात हफ्तार बंडखोरांना समर्थन देणार्‍या रशियाने येथे ‘एस-४००’ क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केल्याचा दावा केला जातो. लिबियन माध्यमांमध्ये रशियन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. रशियाची ही तैनाती तुर्की तसेच लिबियातील सराज सरकारच्या विरोधात असल्याचे बोलले जाते. दरम्यान, फ्रान्सची लिबियातील तैनाती आणि जर्मनीच्या विनाशिकेची गस्त बेकायदेशीर असल्याचा आरोप तुर्की करीत आहे.

एस-४००

पाच दिवसांपूर्वी लिबियातील संघर्षाबाबत सोशल मीडियावर एक फोटो प्रसिद्ध झाला होता. यामध्ये लिबियाच्या पूर्वेकडील ‘रास लनूफ’ या भागात प्रगत क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणि रडार यंत्रणा तैनात केल्याचे दिसत आहे. सदर यंत्रणा जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली एस-३०० किंवा एस-४०० असू शकते, असे अमेरिकी विश्लेषकांचे म्हणणे आहे. या क्षेपणास्त्रांबरोबर “चीझ बोर्ड” रडार यंत्रणा देखील आहे. सदर रडार यंत्रणा एस-४०० सोबत तैनात केली जाते. त्यामुळे रशियाने लिबियात आपली प्रगत यंत्रणा तैनात केल्याचा दावा केला जातो.

एस-४००

लिबियातील आपल्या हितसंबंधांच्या म्हणजे हफ्तार बंडखोरांबरोबरच ‘वॅग्नर’ या मर्सिनरीज् अर्थात कंत्राटी जवानांच्या सुरक्षेसाठी रशियाने सदर यंत्रणा तैनात केल्याचे बोलले जात आहे. रशियन कंत्राटी जवानांचा २१ वाहनांचा ताफा लिबियाच्या जूफ्रा शहरातून सिरतेसाठी रवाना झाल्याचा दावा केला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने सदर यंत्रणा उतरविली असल्याचे अमेरिकी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर रशियाची ही तैनाती तुर्कीच्या ‘टीबी२’ या ड्रोन्सच्या विरोधात असल्याचेही या विश्लेषकांनी म्हटले आहे.

याआधीच मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना भेदण्यासाठी रशियाची पॅंटसीर-१ क्षेपणास्त्र यंत्रणा लिबियात तैनात केली आहे. या दोन्ही यंत्रणांची लिबियातील तैनाती तुर्कीसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. काही आठवड्यांपूर्वी इजिप्तच्या रफायल विमानांनी लिबियातील हवाई हल्ल्यात तुर्कीची हवाई यंत्रणा नष्ट केली होती. यानंतर तुर्कीने रशियाकडून खरेदी केलेली एस-४०० यंत्रणा लिबियात तैनात करण्याचे संकेत केले होते. पण त्याआधीच रशियाने सदर यंत्रणा तैनात करुन तुर्कीला इशारा दिल्याचा दावा अमेरिकी विश्लेषक करीत आहेत.

leave a reply