पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचे ‘अल-कायदा’ आणि ‘आयएस’सोबत जवळचे संबंध – अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

काबूल – पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचे ‘अल-कायदा’ आणि ‘आयएस’सोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनिफ अतमार यांनी केला. यामुळे दक्षिण आशियाई क्षेत्राच्या सुरक्षेला धोका संभवत असल्याचा इशारा अतमर यांनी दिला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. तसेच बुधवारी अफगाणिस्तानात सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये झालेल्या संघर्षात दहा तालिबान ठार झाले. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानात संर्घषबंदी जाहीर केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अफगाणी सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये मोठ्या प्रमाणावर संर्घष भडकला.

'अल-कायदा'

‘आम्ही केवळ तालिबानशीच लढत नाही. तर अफगाणिस्तान एकाचवेळी चार वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी लढत आहोत. सध्या अफगाणिस्तान ‘इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उजबेकिस्तान’, ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ व ‘अल-कायदा’ आणि ‘आयएस’ या दहशतवादी संघटनांचा सामना करीत आहे. या सर्व दहशतवादी संघटनांचे परस्परांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क आहे. अंमली पदार्थांचा व्यवहार या दहशतवादी संघटनामार्फत चालतो. याचा केवळ दक्षिण आशियाई क्षेत्रालाच धोका नाही. तर जगाला धोका संभवतो’, असे अतमार म्हणाले.

सीमेपलीकडील या दहशतवादाचा भारताने अनेकवार निषेध केल्याचे अतमार यांनी यावेळी म्हटले. शेजारी देशांमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अभयारण्यांपासून अफगाणिस्तानला धोका असल्याचे अतमार यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे सहा हजार दहशतवादी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. अतमार यांनी या अहवालाकडे लक्ष वेधले. दरम्यान, बुधवारी अफगाणिस्तानच्या गझनीमध्ये अफगाणी सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये भडकलेल्या संर्घषात १० तालिबानी ठार झाले.

leave a reply