कोरोनाच्या लसी विकसित करण्यासाठी भारत व अमेरिकन कंपन्यांमध्ये सहकार्य

- अमेरिकेतील भारतीय राजदूत

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसची साथ रोखणारी लस विकसित करण्यासाठी भारत व अमेरिकन कंपन्यांमध्ये सहकार्य सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती, अमेरिकेतील भारताच्या राजदूतांनी दिली आहे. दोन्ही देशातील कंपन्या मिळून कोरोनाच्या विरोधात किमान तीन लसी विकसित करीत आहेत, असे राजदूत तरणजीत सिंग संधु यांनी म्हटले आहे.

भारतीय कंपन्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन’ (आयसीएमईआर) तसेच ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन’ आणि अमेरिकी कंपनी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ’ यांच्यातील गेल्या काही वर्षातील वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्य कोरोनाविरोधी लढ्यासाठी सहाय्यक ठरत आहे. या तीन कंपन्यांनी याआधी रोटा व्हायरसच्या विरोधात एकत्रितरित्या काम केले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये माहितीचे आदानप्रदान झाले होते. मात्र, कोरोनाविरोधातील लढ्यात भारत व अमेरिकी कंपन्यांचे सहकार्य अधिक पुढच्या स्तरावर गेल्याचे संधू म्हणाले.

या साथीच्या उच्चाटनासाठी दोन्ही देशांच्या कंपन्या एकत्र आल्या असून किमान तीन लसी तयार करण्यासाठी या कंपन्या संयुक्तरित्या काम करीत असल्याची माहिती संधू यांनी दिली. यात कधी यश मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण दोन्ही देशांचे नेते या संकटाच्या काळात कायम संपर्कात असल्याचे सुचक उद्गार भारतीय राजदूतांनी काढले आहेत. त्याचबरोबर, ‘भारत औषधांची मोठ्या संख्येने निर्यात करू शकतो आणि इतर देश भारतावर विश्वास ठेवू शकतात, हे या संकटाच्या काळात गेल्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने देखील भारताच्या या सहकार्याचा अनुभव घेतला असून अमेरिकी जनतेचा देखील भारतावर विश्वास आहे’, असे संधू यांनी सांगितले.

कोरोनाव्हायरसच्या साथीला जबाबदार असलेला चीन जगभरात अप्रिय देश बनला असून आतापर्यंतच्या साथीवर प्रभावी ठरलेले औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पुरविणारा भारत मात्र जगभरातील लोकप्रिय देश बनला आहे. यामुळे भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा जगभरातील दबदबा वाढला आहे. कोरोनाच्या विरोधातील लस विकसित झाली तर भारत यासाठी फार मोठे योगदान देईल, कारण जगभरात निर्माण होणाऱ्या लसींपैकी ८० टक्के लसीची निर्मिती भारतातच होते, असे दक्षिण कोरियातील एका वैद्यकीय संशोधकाने म्हटले होते. याचा फार मोठा लाभ भारताला मिळत असून यामुळे भारताची जगभरातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे.

leave a reply