पाकिस्तानसंलग्न हक्कानी नेटवर्कचा कमांडर ‘तेहरिक’मध्ये सामील

हक्कानी नेटवर्कचा कमांडरइस्लामाबाद – तालिबानमधील सर्वात प्रभावशील गट मानल्या जाणाऱ्या ‘हक्कानी नेटवर्क’चा कमांडर ‘टिपू गुल मारवात’ ‘तेहरिक-ए-तालिबान’मध्ये सामील झाला. हक्कानी नेटवर्क हा पाकिस्तानच्या प्रभावाखाली असलेला तालिबानचा गट मानला जातो. तेहरिकने नुकतीच पाकिस्तानात भयंकर रक्तपात माजविण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी अफगाणिस्तानातील तालिबानचे पाकिस्तानबरोबरील संबंध तणावपूर्ण बनल्याच्याही बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मारवात याचा तेहरिकमधील सहभाग पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी घातक बाब ठरू शकते.

हक्कानी नेटवर्कचा कमांडरपाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवात या जिल्ह्यामध्ये टिपू गुल मारवातचे नियंत्रण आहे. सदर भाग आत्तापर्यंत हक्कानी नेटवर्कच्या नियंत्रणाखाली होता. पण मारवात आपल्या ताब्यात असलेले तीन गट आणि समर्थकांसह ‘तेहरिक’मध्ये सामील झाल्यामुळे सदर भाग तेहरिकच्या ताब्यात गेल्याचा दावा केला जातो. जानेवारी महिन्यापासूनच पाकिस्तानच्या वझिरिस्तान आणि आसपासच्या प्रांतातील छोटे-मोठे गट तेहरिकमध्ये विलिन होत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ स्थानिक कमांडर तेहरिकला सामील झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हक्कानी नेटवर्क हा गट पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या प्रभावाखाली आहे. हक्कानी गटाला हाताशी धरून पाकिस्तानच्या लष्कराने डोईजड ठरणाऱ्या दहशतवादी संघटनांचा काटा काढला होता. तर हक्कानी आणि आयएसआय यांच्यातील सहकार्य दहशतवाद तसेच अफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी सहाय्यक ठरल्याचा आरोप झाला होता. गेल्या वर्षी अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानच्या राजवटीतही हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. याच हक्कानी नेटवर्कच्या सहाय्याने अफगाणिस्तानचा ताबा मिळविण्याची योजना पाकिस्तानने आखली होती.

हक्कानी नेटवर्कचा कमांडरअफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेल्यानंतर पाकिस्तानात जल्लोष करण्यात आला होता. पण गेल्या काही महिन्यांमध्ये चित्र पूर्णपणे पालटले असून तालिबानमधील इतर गट पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने पश्तूंचे अधिकार डावलल्याचे, त्यांच्या भूभागाचा ताबा घेतल्याचे आरोप तालिबानमधील गटांकडून तीव्र होत आहेत. याचा फायदा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेविरोधात संघर्ष करणाऱ्या ‘तेहरिक’ला होत आहे. त्यामुळे तालिबानमधील काही गट तेहरिकमध्ये सामील होत असल्याचा दावा केला जातो.

पाकिस्तानने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर भीषण रक्तपात माजविण्याची धमकी तेहरिकने काही दिवसांपूर्वीच दिली होती. तर अफगाणिस्तानातील तालिबानने देखील तेहरिकच्या मागण्यांवर पाकिस्तानने विचार करावा, असे सांगून या वादात पाकिस्तानची बाजू घेण्यास नकार दिला होता. ज्या तालिबानला अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी सहाय्य केले, प्रसंगी अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांचा दबाव सहन केला. त्या तालिबानने वेळ आल्यानंतर तेहरिकची बाजू घेऊन पाकिस्तानचा विश्वासघात केल्याची टीका होत आहे. पुढच्या काळात तेहरिकच्या कारवायांना अफगाणिस्तानातील तालिबानचे पूर्ण समर्थन असेल, अशी भीती काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य माजले असून सरकार व विरोधी पक्षामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्याही येत आहेत.

leave a reply