रशियासह इतर देशांबरोबर रुपयामधील व्यवहाराचा भारताला लाभ मिळेल

- रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर अर्थतज्ज्ञांचा दावा

रुपयामधील व्यवहाराचानवी दिल्ली – सोमवारी रिझर्व्ह बँकेने आयात व निर्यातीसाठी रुपयाचा वापर करू देण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर आत्तापर्यंत भारतातील परकीय चलनाची गंगाजळी सुमारे एक लाख कोटी रुपयांनी घटली आहे. अशा परिस्थितीत गंगाजळीतील परकीय चलन वाचविण्यासाठी रुपयांमध्ये व्यवहार करणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरेल. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे डॉलरचा वापर न करू शकणाऱ्या रशियाने भारताबरोबरील व्यवहारासाठी रुपयाचा वापर सुरू केला आहे. याचा लाभ दोन्ही देशांना मिळत असून पुढच्या काळात भारत इतर देशांबरोबरही रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

आधीच्या काळात इराण व नंतर रशियावर अमेरिकेने कडक निर्बंध लादल्यानंतर, भारताचा या देशांबरोबरील व्यवहार बाधित झाला होता. विशेषतः अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या इंधनाचे बिल चुकते करणे भारतासाठी अवघड बनले होते. मात्र युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने रशियाकडून डॉलरच्या वापरावर निर्बंध लादल्यानंतर, भारत व रशियाने रुपया आणि रुबलमध्ये व्यवहार करून या निर्बंधांना बगल दिली. यामुळे आपल्या इंधनाच्या आयातीपैकी रशियाकडून अवघे 0.2 टक्के इतके इंधन खरेदी करणाऱ्या भारताने, युक्रेनच्या युद्धानंतर या खरेदीत प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे.

यामुळे सध्या रशिया भारताला इंधनाचा पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पुढच्या काळात अमेरिकेने निर्बंध टाकलेल्या इतर देशांबरोबरही रुपयामध्ये व्यवहार करण्याचा पर्याय भारतासमोर खुला असेल, असे काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारताच्या एकूण व्यापारात शेजारी देश व रशियाबरोबरील व्यापाराचा हिस्सा 16 टक्क्याहून अधिक असल्याचे सांगितले जाते. यात पाकिस्तानचा समावेश नाही. हा व्यवहार रुपयांमध्ये करण्याची संधी भारतासमोर आहे. यामुळे देशाच्या तिजोरीतील डॉलरची बचत होईल. सध्याच्या स्थितीत देशाला त्याची अधिक आवश्यकता आहे, असे काही विश्लेषकांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या युद्धानंतर डॉलरच्या तुलनेत इतर देशांच्या चलनांबरोबरच भारताच्या रुपयाचीही घसरण झालेली आहे. मंगळवारी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 79.61 पर्यंत आला होता. परदेशी गुंतवणूकदारांनी घेतलेली माघार तसेच जागतिक मंदीची भीती, रुपयाच्या घसरणीला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

अशा परिस्थितीत आपल्या तिजोरीतील डॉलरची बचत करायची असेल, तर शक्य आहे त्या देशांबरोबर रुपयांमध्ये व्यवहार करण्यासाठी भारताला पुढाकार घ्यावा लागेल. त्याची तयारी भारताने केली असून सोमवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेला निर्णय याचाच भाग असल्याचे दिसत आहे. रुपयाच्या इतर देशांबरोबरील चलनांमधील विनिमयाचा दर बाजारपेठ नियंत्रित करील, अशी घोषणाही रिझर्व्ह बँकेने केली होती. मात्र भारताच्या या निर्णयावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया येण्याची दाट शक्यता आहे. याआधी भारताने रशियाबरोबर रुपी-रूबलमध्ये व्यवहार करू नये, असे अमेरिकेने भारताला बजावले होते.

leave a reply