इराणच्या अणुकार्यक्रमाचे अतिशय विघातक परिणाम संभवतात

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा इशारा

पॅरिस – इराणच्या अणुकार्यक्रमाचे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाहीत, असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबरील चर्चेनंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या या इशाऱ्याला फार मोठे महत्त्व आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू फ्र्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी फ्रान्सला इराणच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी केलेले राजनैतिक प्रयत्नाला यश मिळविले, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानपदावर आलेल्या बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणच्या विरोधात राजनैतिक आघाडी उघडली आहे. नेत्यान्याहू यांचा फ्रान्स दौरा हा या आघाडीचा भाग ठरतो. पंतप्रधान नेत्यान्याहू व राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर फ्रान्सने इराणच्या अणुकार्यक्रमावरून दिलेला इशारा लक्षणीय ठरतो. त्याचा दाखला देऊन पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या राजनैतिक आघाडीला यश मिळाल्याचे दावे विश्लेषक करीत आहेत. 2015 साली अमेरिका व युरोपिय देशांनी मिळून इराणबरोबर अणुकरार केला होता. मात्र इराणने युक्रेनच्या युद्धात रशियाला ड्रोन्स पुरविल्यानंतर तसेच आपल्याच देशातील निदर्शकांवर अत्याचार करून युरोपिय देशांचे समर्थन गमावले आहे, असा दावा इस्रायलच्या पंतप्र्रधानांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यात केला.

दरम्यान, इराणच्या इस्फाहन शहरातील क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात सदर कारखान्याची फार मोठी हानी झाल्याचे दावे केले जातात. सुरूवातीच्या काळात याची माहिती दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणने कालांतराने या स्फोटामागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचा हात असल्याचे म्हटले होते. यावर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याचे राजनैतिक व सामरिक महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमावरून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर, इराणच्या अण्वस्त्रांमुळे संभवणाऱ्या धोक्यांची इस्रायली पंतप्रधानांनी जाणीव करून दिली. अण्वस्त्रे संपादन केल्यानंतर इराण आखाती देशांमधील आपला हस्तक्षेप अधिकच वाढविल व याचे विघातक परिणाम समोर येतील, असे पंतप्राधान नेत्यान्याहू यांनी बजावले आहे. त्याचवेळी युक्रेनवर हल्ले चढविण्यासाठी रशियाला ड्रोन्सचा पुरवठा करून इराणने युरोपिय देशांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे, याकडेही नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधले आहे.

फ्रान्सच्या पाठोपाठ युरोपातील प्रमुख देश असलेल्या जर्मनीने देखील इराणच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारावी, यासाठी इस्रायलचे पंतप्रधान प्रयत्न करणार असल्याचे संकेत विश्लेषक देत आहेत. इराणच्या विरोधात आखाती देशांबरोबर युरोपिय देशांचीही आघाडी उघडून इराणची कोंडी करण्याची जोरदार तयारी इस्रायलच्या नव्या सरकारने केली आहे. इराणवर लष्करी कारवाईचे स्पष्ट संकेत इस्रायली सरकारकडून दिले जात असतानाच, राजनैतिक आघाडीवर इराणची अधिकाधिक कोंडी करण्यासाठी इस्रायलने हालचाली वाढविल्या आहेत. त्यासाठी युक्रेनच्या युद्धात इराणने रशियाला सहाय्य करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा इस्रायलचे पंतप्रधान मोठ्या कौशल्याने वापर करीत असल्याचे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply