अमेरिकेच्या अण्वस्त्रांना अण्वस्त्रांनीच उत्तर मिळेल

- उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाची धमकी

सेऊल – अमेरिका आणि त्याच्या गुलाम देशांचा बेजबाबदार लष्करी सराव आणि कारवायांमुळे कोरियन क्षेत्राला असलेला धोका वाढला आहे. पण अमेरिकेच्या कुठल्याही लष्करी कारवाईला उत्तर कोरियाकडून कठोर प्रत्युत्तर मिळाल्यावाचून राहणार नाही. अमेरिकेच्या अण्वस्त्रांना अण्वस्त्रांनीच आणि सर्वंकष युद्धाला सर्वंकष युद्धानेच उत्तर मिळेल, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली आहे.

आवश्यकता भासल्यास अमेरिका आपली अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र यंत्रणा पूर्ण क्षमतेने दक्षिण कोरियात तैनात करील, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने ही धमकी दिली. उत्तर कोरिया थेट अमेरिकेपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणाव वाढवीत आहे. उत्तर कोरियाच्या मागे चीनचे पाठबळ असल्याचे दावे केले जातात. चीन व उत्तर कोरियाच्या आक्रमकतेविरोधात भूमिका स्वीकारण्यासाठी जपान आणि दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करीत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने जपान आणि दक्षिण कोरियातील आपल्या तैनातीत वाढ करण्याचे संकेत दिले होते. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाचा दौरा करून याबाबत महत्त्वाची घोषणा केली. दक्षिण कोरियाला नाटोच्या सदस्य देशांच्या धर्तीवर सुरक्षा पुरविण्याची ग्वाही ऑस्टिन यांनी दिली. उत्तर कोरियाच्या अणुहल्ल्याचा धोका वाढलाच तर दक्षिण कोरियामध्ये थेट अमेरिका आपली अण्वस्त्रेही तैनात करील, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते.

यानंतर बुधवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलामध्ये संयुक्त सराव पार पडला. यात अमेरिकेच्या एफ-22 आणि एफ-35 लढाऊ विमानांबरोबर बी-1बी बॉम्बर्स विमानांनीही सहभाग घेतला. दक्षिण कोरिया बरोबरील सहकार्य आणि तैनातीबाबत अमेरिका अतिशय गंभीर आहे, हे दाखवून देण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर कोरियाने लष्करी कारवाईची आगळीक केलीच तर अमेरिका दक्षिण कोरियाच्या सहाय्यासाठी धावून येईल, असा संदेश या सरावाद्वारे देण्यात आला होता. पुढच्या काळातही अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारच्या सरावांचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे. तसेच दक्षिण कोरियामध्ये बॉम्बर्स विमानांच्या तैनातीबाबत अमेरिका गांभीर्याने विचार करीत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

तर अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. अशा परिस्थितीत सदर सरावाबरोबरच अमेरिकेकडून दक्षिण कोरियात अण्वस्त्रे तैनात करण्याच्या इशाऱ्यामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या धमकीमध्ये सर्वात विनाशकारी अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असे धमकावले.

कोरियन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तैनाती करण्यासाठी अमेरिका सबबी देत आहे. पण अमेरिकेच्या लष्करी हालचालींना तितकेच कठोर उत्तर दिले जाईल. अमेरिकेच्या अण्वस्त्रांना अण्वस्त्रांनीच आणि सर्वंकष युद्धाला सर्वंकष युद्धानेच उत्तर दिले जाईल. अमेरिकेचे इरादे यशस्वी होऊ देणार नाही, अशी घोषणा उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

दरम्यान बायडेन प्रशासन आणि दक्षिण कोरियाचे सरकार उत्तर कोरिया बरोबर चर्चा करून सदर वाद मिटविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करीत नसल्याची टीका अमेरिकेतील काही नेते करीत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर युद्धसरावांची मालिका सुरू केल्यानंतरच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला, असे या अमेरिकन नेत्यांचे म्हणणे आहे.

leave a reply