भारत व मध्य आशियाई देशांच्या सहकार्याचे अधिकच महत्त्व वाढले

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

नवी दिल्ली – ‘अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत आपण सारे जण चिंतित आहोत. त्यामुळेच भारत आणि मध्य आशियाई देशांमधील सहकार्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि किरगिझ रिपब्लिक या पाच मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील व्हर्च्युल बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते.

भारत व मध्य आशियाई देशांची पायाभूत सुविधांनी जोडणी, सहकार्य यांचा पुढच्या ३० वर्षांसाठीचा आराखडा तयार करणे हा या व्हर्च्युअल बैठकीमागील प्रमुख उद्देश असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. विस्तारित शेजारी देशांमधील स्थैर्य, सुरक्षा आणि शांतता कायम राखण्याच्या भारताच्या धोरणाचा मध्यबिंदू मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्य हा आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

भारत व मध्य आशियाई देशांच्या सहकार्याचे अधिकच महत्त्व वाढले - पंतप्रधान नरेंद्र मोदीभारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पाचही मध्य आशियाई देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार होते. पण कोरोनाच्या साथीमुळे ते या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या दुसर्‍या दिवशी भारत व मध्य आशियाई देशांमध्ये ही व्हर्च्युअल बैठक पार पडली. त्याची घोषणा झाल्यानंतर, चीन अस्वस्थ झाल्याचे समोर आले होते. म्हणूनच भारताने आयोजित केलेल्या या बैठकीच्या दोन दिवस आधी चीननेही मध्य आशियाई देशांबरोबर व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले होते.

यामुळे भारताच्या कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि किरगिझ रिपब्लिक या देशांबरोबरील सहकार्याचा धसका चीनने घेतल्याचे उघड झाले आहे. फार आधीपासून चीन या मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आला आहे. मात्र एकेकाळी सोव्हिएत संघराज्याचा भाग असलेल्या या देशांवरील चीनचा वाढता प्रभाव आपल्यासाठी घातक ठरेल, याची जाणीव रशियाला झालेली आहे. या देशांबरोबरील व्यापार व इतर क्षेत्रातील सहकार्यासाठी चीनपेक्षा भारत हा अधिक विश्‍वासार्ह पर्याय ठरतो, असे रशियाला वाटत आहे. म्हणूनच रशिया भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्याला प्रोत्साहन देत आहे.

त्याचवेळी अफगाणिस्तानातील घडमोडींमुळे दक्षिण व मध्य आशियाई क्षेत्राचे स्थैर्य आणि सुरक्षा धोक्यात आलेली आहे. अफगाणिस्तानातील भारत, रशिया तसेच मध्य आशियाई देशांचे हितसंबंध एकसमान बनले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या व्हर्च्युअल बैठकीत ही बाब स्पष्ट केली होती. यामुळे भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील सहकार्याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व आले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेल्या मध्य आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापाराची अडवणूक करण्याचे धोरण पाकिस्तानने स्वीकारले होेते. पण भारताने इराणचे छाबहार बंदर विकसित करून त्या मार्गाने मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापाराचा पर्यायी मार्ग विकसित केला आहे. इराणही या व्यापारासाठी सहकार्य करण्यास विशेष उत्सुकता दाखवित आहे. यामुळे पाकिस्तानचे भौगोलिक महत्त्व कमी झाल्याचे समोर येत आहे.

leave a reply