उत्तर कोरियाकडून दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल – नववर्षाच्या सुरुवातीपासून क्षेपणास्त्र चाचणीचा धडाका लावणार्‍या उत्तर कोरियाने आणखीन दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या महिन्यातील उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांची ही सहावी फेरी ठरते. अमेरिकेच्या कारवाया ‘डेंजर लाईन’पर्यंत पोहोचल्या असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या आण्विक व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करण्यात येतील, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग उन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

उत्तर कोरियाकडून दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीदक्षिण कोरियाच्या संरक्षणदल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजता उत्तर कोरियाने दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवरून प्रक्षेपित करण्यात आलेली ही क्षेपणास्त्रे १९० किलोमीटर प्रवास करून या देशाच्या सागरी हद्दीतच कोसळली. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी या क्षेपणास्त्र चाचण्यांवर टीका केली आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आहेत, अशी टीका पंतप्रधान किशिदा यांनी केली.

गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाने वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. या आठवड्यात मंगळवारी उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. तर दहा दिवसांपूर्वी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. या चाचण्यांद्वारे उत्तर कोरिया आपल्याकडील क्षेपणास्त्रांची क्षमता दाखवून देत आहे. या चाचण्या म्हणजे जपान, दक्षिण कोरिया यांच्यासह अमेरिकेसाठी इशारा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. उत्तर कोरियाकडून दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीमर्यादित स्त्रोत आणि कठोर आर्थिक निर्बंध असूनही आपल्या क्षेपणास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमात अजिबात फरक पडलेला नाही, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उन दाखवून देत आहे, याकडे दक्षिण कोरियन विश्लेषक लिफ एरिक इजले यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीद्वारे या क्षेत्रात तणाव वाढविल्याचा आरोप करून अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडला होता. पण राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्या चीन आणि रशियाने अमेरिकेचा हा प्रस्ताव रोखला होता. त्याचबरोबर या निर्बंधांद्वारे अमेरिका इतर देशांवर आपले वर्चस्ववादी धोरण लादण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका चीनने केली.

leave a reply