कोरोनामुळे अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये ३,९०३ जणांचा बळी

वॉशिंग्टन – कोरोना साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील जीवितहानीच्या आकडेवारीत सातत्याने मोठी भर पडताना दिसत आहे. बुधवारी २४ तासांच्या अवधीत अमेरिकेतील तीन हजार, ९०३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याच काळात अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये कोरोनाचे तब्बल सव्वा लाख रुग्ण दाखल झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरची अमेरिकेतील ही सर्वोच्च पातळीवरील नोंद ठरली आहे. याच पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेतील ‘सीडीसी’ या आरोग्य यंत्रणेने पुढील २४ दिवसांमध्ये ८२ हजारांहून अधिक जण दगावू शकतील, असा गंभीर इशारा दिला.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीची दुसरी लाट जगभरात हाहाकार माजवित असल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत कोरोनाच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ कोटी २८ लाखांवर गेली असून १८ लाखांहून अधिक जण दगावले आहेत. अमेरिकेसह, युरोप, लॅटिन अमेरिका, आखात, आशियाई देश व आफ्रिका अशा सर्वच खंडांमध्ये कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया यासारख्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे नवे प्रकार (स्ट्रेन) आढळले असून त्याने रुग्णांच्या संख्येत वेगाने भर पडत असल्याचे दिसून आले आहे.

ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार इतर युरोपिय देशांसह अमेरिका तसेच आशियाई देशांमध्येही आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतही कोरोनाचा नवा प्रकार आढळू शकतो, असे संकेत संशोधकांकडून देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेत वाढणारी बळींची व रुग्णांची संख्या खळबळ उडविणारी ठरली आहे. अमेरिकेत बुधवारी ३,९०३ जणांचा बळी गेला असून एकूण संख्या तीन लाख ४२ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाची लागण होणार्‍यांच्या संख्येत दोन लाख २९ हजारांची भर पडली असून त्यातील सव्वा लाख जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एकूण रुग्णांची संख्या एक कोटी, ९७ लाख ४० हजारांहून अधिक झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन व रशियामध्येही कोरोना साथीचा फैलाव वेगाने वाढत आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून ९८१ जण दगावले आहेत. ब्रिटनमधील एकूण बळींची संख्या ७२ हजारांवर गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या वाढत्या हाहाकाराच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी दुसर्‍या लसीला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. रशियाने आपल्याकडील कोरोनाचे बळी यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा तिपटीहून अधिक असल्याची कबुली दिली आहे. नव्या माहितीनुसार रशियात कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या एक लाख ८६ हजारांवर गेली आहे.

दरम्यान, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) कोरोनाव्हायरस ही मोठी साथ नसून त्याहून मोठ्या आजारांना पुढील काळात तोंड द्यावे लागेल, असा खळबळजनक इशारा दिला. ‘डब्ल्यूएचओ’चे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर माईक रायन यांनी कोरोनाची साथ ही मानवजातीसाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचेही बजावले आहे.

leave a reply