अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांवरील हल्ल्यांसाठी चीनने इनामाची घोषणा केली होती

- अमेरिकी संकेतस्थळाचा दावा

व्हर्जिनिया – चीनने ‘नॉन-स्टेट अ‍ॅक्टर्स’ना पैसा पुरवून अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांना लक्ष्य करण्याची ऑफर दिली होती. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ही माहिती पुरविली होती. अमेरिकेतील संकेतस्थळाने गोपनीय माहितीच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली, मात्र अद्याप या बातमीची पडताळणी करता आलेली नाही.

१७ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्षांना देण्यात येणार्‍या माहितीमध्ये अफगाणिस्तानातील चीनच्या कारवायांबाबत तोंडी माहिती देण्यात आली होती. चीन अफगाणिस्तानातील अमेरिकी जवानांना लक्ष्य करण्यासाठी नॉन-स्टेट अ‍ॅक्टर्सना इनाम देत असल्याची ही माहिती होती. ट्रम्प प्रशासन आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने सदर गोपनीय माहितीला पुष्टी देणारे पुरावे मिळवित असल्याची माहिती एका अधिकार्‍याने या संकेतस्थळाला दिली आहे.

अमेरिकी संकेतस्थळामध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीबाबत व्हाईट हाऊस तसेच वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना ही माहिती समोर आल्याचे सदर संकेतस्थळाने लक्षात आणून दिले. ही माहिती खरी ठरल्यास, अमेरिका व चीनमधील तणाव वाढू शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे सत्तासूत्रे सोपविण्याआधी चीनवर नवी कारवाई करण्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

काही आठवड्यांपूर्वी रशियाने अफगाणिस्तानातील अमेरिकी जवानांवर हल्ल्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रशियाने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. तर त्याआधी इराणने देखील अमेरिकी जवानांना लक्ष्य करण्यासाठी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना हाताशी धरल्याचे आरोप झाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’चे गुप्तहेर अफगाणिस्तानात दहशतवादी केंद्र चालवित असल्याचे उघड झाले होते.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने किमान दहा चिनी हेरांना परवान्याखेरीज शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. या चिनी हेरांनी पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क या तालिबानसंलग्न दहशतवादी संघटनेशी संपर्क साधल्याचे उघड झाले होते. यानंतर खवळलेल्या अफगाणी जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या चीनने माफी मागावी, अशी मागणी अफगाण सरकारने केली होती.

leave a reply