कोरोना व वाढत्या संघर्षामुळे जगभरात दर मिनिटाला 11 जणांचा भूकबळी – ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’चा विचलित करणारा अहवाल

‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’

लंडन – कोरोनाची साथ, वाढते संघर्ष व हवामानबदलाची समस्या यामुळे जगात दर मिनिटाला 11 जणांचा भूकबळी जात असल्याचा गंभीर अहवाल ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेने दिला आहे. कोरोनाच्या साथीबरोबरच जगात सध्या ‘हंगर पॅन्डेमिक’ सुरू असून यावर्षी दोन कोटींहून अधिक जण उपासमारी व अन्नटंचाईच्या खाईत लोटले गेल्याचा दावा ऑक्सफॅमने केला.

शुक्रवारी ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ने ‘द हंगर व्हायरस मल्टिप्लाईज’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. जगभरातील 15 कोटींहून अधिक जणांना अन्नटंचाई व उपासमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती, या अहवालात देण्यात आली आहे. ‘ही आकडेवारी अतिशय भीतीदायक आहे. पण प्रचंड त्रास सहन करणार्‍या एकेका व्यक्तीच्या माध्यमातून ती तयार झाली आहे, हे विसरले जाऊ शकत नाही’, असे ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’चे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅबी मॅक्समन यांनी म्हटले आहे.

‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’उपासमारी व अन्नटंचाई सहन करणार्‍या नागरिकांमधील दोन तृतियांश जणांना संघर्षाच्या वाढत्या तीव्रतेमुळे समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे. यात 23 देशांमधील 10 कोटींहून अधिक जणांचा समावेश आहे. ‘अन्नटंचाईचा वापर युद्धातील शस्त्र म्हणून करण्यात येत आहे. उपासमारी व अन्नधान्याची टंचाई यांचा मुकाबला करण्याऐवजी विविध गट परस्परांशी संघर्ष करण्यात व्यस्त आहेत’, याची जाणीव मॅक्समन यांनी यावेळी करून दिली.

आफ्रिका खंडातील चार देशांमध्ये गेल्या सहा महिन्यात पाच लाखांहून अधिक जणांची भर पडल्याचे ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ने नमूद केले. त्यात येमेन, इथिओपिया, साऊथ सुदान व मादागास्कर या देशांचा समावेश आहे. कोरोनाची साथ व अर्थव्यवस्थेवर त्याचे झालेले भीषण परिणाम यामुळे व्हेनेझुएला, अफगाणिस्तान व डीआर काँगो यासारख्या देशांमध्ये उपासमारीच्या समस्येने अधिक गंभीर रुप धारण केल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ व त्याच्या आर्थिक परिणामांमुळे अन्नधान्याच्या किमतींमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली असून त्यामुळे लक्षावधी नागरिक उपासमारीच्या संकटात लोटले गेल्याचा दावाही ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’च्या अहवालात करण्यात आला आहे.

leave a reply