केरळमध्ये ‘झिका’चा उद्रेक

- 14 रुग्ण आढळले । केंद्रीय पथक केरळात दाखल

नवी दिल्ली – देश कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असताना केरळात ‘झिका’ विषाणूचा फैलाव झाला आहे. केरळात या विषाणूची लागण झालेले 14 रुग्ण आतापर्यंत आढळले असून यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश होते. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा सदस्यांचे एक पथक तातडीने केरळमध्ये पाठविले आहे. हे केंद्रीय पथक परिस्थितीची पाहणी करून राज्य सरकारला सहाय्य करील.

केरळामध्ये ‘झिका’चा उद्रेक - 14 रुग्ण आढळले । केंद्रीय पथक केरळात दाखलकोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. देशात अजून 40 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण दरदिवशी आढळत आहेत. तसेच तिसर्‍या लाटेचाही धोका व्यक्त केला जात आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण असताना केरळात ‘झिका’ विषाणूंनी संक्रमित रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद केरळमध्येच होत आहे. तसेच दरदिवशी 100 हून अधिक मृत्यूही केरळात नोंदविले जात आहेत. त्यामध्ये ‘झिका’च्या रुग्णांची नोंद झाल्याने या विषाणूचा फैलाव अधिक होऊ नये याचे मोठे आव्हान केरळ सरकारसमोर उभे ठाकले आहे.

सर्वप्रथम एका 24 वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाल्याचे लक्षात आले होते. या महिलेच्या अंगावर लाल पुरळ उठल्यावर व सांधेदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे रक्ताचे नमुने ‘द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ (एनआयव्ही)मध्ये पाठविण्यात आले होते. तपासणीत या महिलेला झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आणखी 13 जण झिकाने संक्रमित झाल्याचे एनआयव्हीकडून प्राप्त अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती केरळ सरकारने दिली.
‘झिका’ विषाणू डासांमार्फत फैलावत असून याची लागण झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. ‘झिका’ची लागण झालेल्या तरुण व लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर या समस्येचा सामना करावा लागतो. तर गर्भवती स्त्रीयांना ‘झिका’ची लागण झाल्यास त्यांच्या गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होता. साधारण डेंग्यूसारखी लक्षणे असलेल्या या रोगाचा 2018 सालामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही उद्रेक झाला होता.

या दोन राज्यात दीडशेहून अधिक रुग्ण आढळले होते. पण ‘झिका’चा फैलाव रोखण्यासाठी तातडीने करण्यात आलेल्या उपायांमुळे त्याचा फैलाव रोखता आला होता. याआधी 2017 सालात तमिळनाडू व गुजरातमध्ये झिकाच्या काही रुग्णांची नोंद झाली होती. झिका हा आजार आफ्रिकेतील युगांडातील झिका जंगलांमध्ये प्रथम 1947 साली नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आफ्रिकेतील इतर देशातही व आशियाई देशांमध्ये पसरला.

2016 साली ब्राझिलमध्ये या आजाराचा मोठा उद्रेक झाला होता. त्यानंतर पहिल्यादांच भारतात ‘झिका’चे रुग्ण आढळले होते. 2016 साली ब्राझिलमध्ये झिकाच्या प्रचंड फैलावामुळे कितीतरी बालके जन्मत:च मेंदूचा पूर्ण विकास न होताच जन्माला आली होती. यामुळे हजारो महिलांनी ‘झिका’च्या भीतीने बाळांना जन्म न देण्याचा निर्णय घेतला होता.

leave a reply