पर्ल हार्बर, ९/११ पेक्षाही कोरोनाचा अमेरिकेवरील हल्ला भयंकर -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही कोरोनाव्हायरसचा अमेरिकेवरील हल्ला अधिक भयंकर आहे. इतिहासात अमेरिकेवर असा भीषण हल्ला झालेला नाही. जिथून या साथीचा उगम झाला तिथेच अमेरिकेवरील हा हल्ला रोखता येऊ शकला असता. पण तसे झाले नाही’, अशा भेदक शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला नवा इशारा दिला आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच ही साथ आल्याचे पुरावे अमेरिकेकडे असल्याचे जाहीर करून चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे.

जपानने पर्ल हार्बर येथील अमेरिकन नौदलाच्या तळावर ठरविलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका व जपानमधील युद्धाला तोंड फुटले होते. जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने दुसरे महायुद्ध संपुष्टात आणले होते. तर ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवादविरोधी युद्ध पुकारून अफगाणिस्तान व इराक या देशांवर चढाई केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसची साथ म्हणजे अमेरिकेवरील हल्ला असल्याचे सांगून हा हल्ला पर्ल हार्बर व ९/११ पेक्षाही अधिक भीषण असल्याचे सांगून खळबळ माजली आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केलेली असताना ट्रम्प यांनी अमेरिका कोरोनाच्या अदृष्य शत्रूशी लढत असल्याचे सांगून आपल्या विधानांची आक्रमकता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला.

‘हे वेगळ्या प्रकारचे युद्ध आहे. या युद्धातील आपला शत्रू अदृश्य आहे. याआधी दृश्य शत्रूच्या विरोधात अमेरिकेने युद्ध जिंकले होते. अदृश्य शत्रूच्या विरोधातील युद्ध अवघड असूनही अमेरिका या शत्रूला चांगल्यारितीने प्रत्युत्तर देत आहे’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या कोरोनाव्हायरसच्या साथीत अमेरिकेतील ७२ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून बारा लाखांहून अधिक जणांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाली आहे.

‘कोरोनाव्हायरसचा अमेरिकेवरील हल्ला जिथून या साथीचा उगम झाला तिथेच रोखता येऊ शकला असता. पण तसे झाले नाही’, असे सूचक उद्गार काढून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या साथीमुळे झालेल्या अमेरिकेच्या हानीला चीनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यासाठी थेट चीनला जबाबदार धरले होते. अमेरिका या साथीची चौकशी करीत असून यात चीन जबाबदार आढळला तर या देशाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी बजावले होते. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी कोरोनाव्हायरसची साथ चीनच्या वुहान प्रयोगमधील प्रयोगशाळेतूनच पसरल्याचे पुरावे असल्याचे जाहीर करून यापुढे चीनवरील कारवाई अटळ असल्याचे संकेत दिले आहेत.

आतापर्यंत अमेरिका लढलेल्या कुठलाही युद्धात कोरोनाव्हायरसच्या साथी इतकी हानी अमेरिकेला सहन करावी लागली नव्हती. त्यामुळे या साथीला जबाबदार असलेल्या चीनकडून जबरदस्त नुकसानभरपाई वसूल केल्याखेरीज अमेरिका व अमेरिकेचे मित्रदेश स्वस्थ बसणार नाहीत, असा निष्कर्ष काही विश्लेषकांनी नोंदविला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आक्रमक उदगार याची साक्ष देत आहेत. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे घसरलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आता योद्धा बनावे लागेल, असा संदेशही ट्रम्प यांनी आपल्या देशबांधवांना दिला आहे.

leave a reply