चीनबरोबरील सहकार्याचा पाकिस्तानला दारूण पश्चाताप होईल

- पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्याचा इशारा

वॉशिंग्टन – पाकिस्तान चीनकडे आपला मित्रदेश म्हणून पाहत आहे. पण चीन मात्र पाकिस्तानला आपली वसाहत मानतो. या वसाहतीत कितीही जणांचा जीव गेला तरी, चीनला त्याची पर्वा नाही. पाकिस्तानही चीनला खूश करण्यासाठी आपल्या जनतेचा बळी द्यायला तयार आहे. भारत आणि अमेरिकेमधील सहकार्य वाढत असताना, चीनबरोबर आघाडी करून पाकिस्तान त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे खरा. पण चीनबरोबरचे हे सहकार्य पाकिस्तानवर पश्चातापाची वेळ आणल्यावाचून राहणार नाही’, अशा खणखणीत शब्दात पेंटॅगॉनचे माजी अधिकारी डॉक्टर मायकल रुबिन यांनी पाकिस्तानला विदारक वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

अमेरिकेतील एका द्विमासिकात लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखाद्वारे डॉक्टर मायकल रुबिन यांनी पाकिस्तानी बुद्धिमंत, विश्लेषक आणि पत्रकारांची झोप उडविणारे मुद्दे अत्यंत परखडपणे मांडले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद तसेच पाकिस्तानच्या इतर कुरापतींना पाठीशी घातले आहे. त्यामुळे चीनने आपली बाजू घेतली आणि मैत्रीचे पालन केले, या भ्रमात पाकिस्तानने राहू नये. कारण चीन पाकिस्तानकडे मतलबी नजरेने पाहत आहे. पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातून पश्चिम आशियाबरोबर व्यापार करण्यासाठी चीन हा खटाटोप करीत आहे, याकडे रुबिन यांनी लक्ष्य वेधले.

‘जो देश केवळ इस्लामधर्मीय आहेत म्हणून दहा लाख जणांना तुरुंगात डांबतो, तो देश गरज पडल्यास पाकिस्तानींचा बळी घेण्यात आणि त्यांना कस्पटासमान वागणूक देण्यास अजिबात कचरणार नाही. आज कदाचित पकिस्तानींना याची कल्पना येणार नाही. पण लवकरच पाकिस्तानला याची जाणीव होईल. चीनबरोबर आपण केलेले सहकार्य म्हणजे सैतानाशी केलेला करार ठरतो आणि यातून काहीही हाती लागणार नाही, उलट पाकिस्तानवर दारूण पश्चातापाची वेळ ओढावेल’, असा इशारा रुबिन यांनी दिला.

“‘सीपीईसी’ हा पाकिस्तानसाठी मोठे संकट ठरेल. या प्रकल्पामुळे पाकिस्तानात मोठी जीवितहानी होईल. सुट्टीवर गेलेले हजारो चिनी मजुर सीपीईसी प्रकल्पावर काम करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात परतत आहेत. चीनने त्यांची वैद्यकीय चाचणी केलेली नाही किंवा त्यांना क्वारंटाईन देखील केलेले नाही. या चिनी मजुरांमुळे पाकिस्तानात कोरोनाचा विस्फोट होईल आणि पाकिस्तानला भयंकर जीवितहानी सहन करावी लागेल, याला चीन जबाबदार असेल”, असा इशारा रुबिन यांनी दिला.

अशारितीने ‘सीपीईसी’ प्रकल्पासाठी पाकिस्तानने स्वत:ला चीनची वसाहत बनवून घेतले आहे. चीनने पाकिस्तानात काही केले तरी, त्याच्याविरोधात पाकिस्तानी नेतृत्व अवाक्षरही काढू शकत नाही, तशी कबुली पाकिस्तानने दिलेली आहे. त्यामुळे आपल्या या वसाहतीत कितीही जणांचा बळी गेला तरी चीनला त्याची काडीचीही फिकिर नसेल, अशा जळजळीत शब्दात पाकिस्तानच्या चीनधार्जिण्या धोरणाचा रुबिन यांनी समाचार घेतला आहे.

leave a reply