अमेरिका-युरोपमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता अधिकच वाढली

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसने अमेरिकेत बुधवारी २६०० जणांचा बळी घेतला असून अमेरिकेत या साथीमुळे एकूण २८,३२६ जण दगावले आहेत. जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, युरोपमधील या साथीच्या रुग्णांची संख्या गेल्या दहा दिवसात दुप्पटीने वाढल्याची माहिती समोर येत आहे. जगभरात या साथीमुळे १,३८,१०४ जणांचा बळी गेला असून २०,७७,९७४ रूग्णांना या साथीची लागण झाली आहे.

आत्तापर्यंत या साथीतून सव्वापाच लाख जण बरे झाल्याची माहिती अमेरिकी जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. या साथीने अमेरिकेत सर्वाधिक जणांचा बळी घेतला असून अमेरिकेसाठी सर्वात कठीण आठवडा सुरू झाल्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी देत आहेत. या साथीचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून सव्वा दोन कोटी जण बेरोजगार झाले आहेत.

असे असले तरी ही साथ निदान काही प्रमाणात नियंत्रणात येत असून नव्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. तसेच अमेरिकेतील बळींची संख्या जगात सर्वाधिक असली तरी बाकीचे देश याबाबत खूपच लपवाछपवी करीत आहेत. तर अमेरिका मात्र याबाबत पूर्ण पारदर्शक आहे. विशेषत: चीनसारखे देश मात्र आपल्याकडील बळींची संख्या कमी असल्याचे भ्रामक चित्र उभे करीत आहेत, असा टोला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लगावला.

या साथीने ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात ८६१ जणांचा बळी गेला असून या देशात १३,७२९ जण या साथीत दगावले आहेत. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण १,०३,०९३ रुग्ण आहेत. याबरोबर ब्रिटनच्या सरकारने देशातील लॉकडाउन आणखी एका आठवड्यांनी वाढविण्याची घोषणा केली. दोन दिवसांपूर्वी लॉकडाउनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविली होती. पण या साथीचा फैलाव रोखायचा असेल तर हा लॉकडाउन वाढविणे आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे परराष्ट्रमंत्री डॉमनीक राब यांनी सांगितले.

दरम्यान, युरोपिय देशांमधील एकूण बळींची संख्या ९० हजारांवर पोहोचली असून युरोपमध्ये या साथीचे ९,९३,२७५ रुग्ण आहेत. गेल्या दहा दिवसात या साथीच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.

leave a reply