देशात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ४२०

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ४२० वर, तर रुग्णांची संख्या १२,७५९ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला आणि ८२६ नवे रुग्ण आढळले. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडेल आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात २८६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२०२ वर गेली आहे.

गुरुवारी महाराष्ट्रात ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील ३ जण मुंबईतील आणि ४ जण पुण्यातील आहेत. त्यामुळे राज्यात या साथीत दगावलेल्यांची संख्या १९४ वर पोहोचली आहे. मुंबईतच आतापर्यंत २०७३ रुग्ण आढळले असून  ११७ जण दगावले आहेत. मुंबईत धारावी भागात दिवसभरात २६ नवे रुग्ण आढळले. यामुळे या दाट लोकवस्तीच्या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. मुंबईत खार पोलीस ठाण्यात तैनात एका  पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.  शहरात आतापर्यंत १६ पोलिसांना या साथीची लागण झाली आहे. बुधवारी मुंबईत ५ पोलीस पॉझिटिव्ह आढळले होते. ठाण्यात ९ आणि बदलापुरात ८ नवे रुग्ण सापडले.

दरम्यान मध्य प्रदेशात ११०, दिल्लीत ६२, गुजरातमध्ये ५८, राजस्थानात ५५, तामिळनाडूत २५, हरियाणात ११ नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत, असे म्हणता येणार नाही.  आतापर्यंत देशात 2 लाख 90 हजार 401 कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत त्यापैकी बुधवारीच 30 हजारांपेक्षा जास्त चाचण्या झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तसेच ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात देशात 24 टेस्टिंग मागे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याचे म्हटले आहे. जपानमध्ये हेच प्रमाण 11.7 व्यक्तींमागे एक, इटलीमध्ये 6.7, अमेरिकेत 5.3, ब्रिटनमध्ये 3.4 असे असल्याची माहिती ‘आयसीएमआर ‘ने दिली.

leave a reply