ऑस्ट्रेलियात पाच पट वेगाने कोरोना फैलावत आहे

- वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याचा इशारा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील ‘साऊथ ऑस्ट्रेलिया’ प्रांतात आढळलेल्या कोरोनाव्हायरसचा प्रकार(स्ट्रेन) पाच पट वेगाने साथ फैलावत आहे, असा गंभीर इशारा वरिष्ठ आरोग्य अधिकारी निकोला स्परिअर यांनी दिला आहे. कोरोनाव्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे अवघ्या 24 तासात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आल्याचे स्परिअर यांनी सांगितले. यापूर्वी तीन ते पाच दिवसात कोरोना विषाणूची लागण होऊन आजाराला सुरुवात होत असल्याचे दिसत होते.

पाच पट वेगाने

गेल्या वर्षी चीनच्या वुहान शहरातून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाव्हायरसच्या रचनेत वेगवेगळे बदल होत असल्याचे दिसत होते. मात्र विषाणूची लागण होऊन रोगाची सुरुवात होण्यासाठी तीन ते पाच दिवस किंवा सात दिवस लागत असल्याचे आढळून आले होते. मात्र ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी त्या देशातील विषाणूचा प्रकार अवघ्या 24 तासात आजाराचा फैलाव सुरू करीत असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे 27 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून त्यातील 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही आठवड्यात ऑस्ट्रेलियात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले असून सुमारे चार हजार रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ‘साऊथ ऑस्ट्रेलिया’ प्रांतातील प्रमुख शहर असणाऱ्या ॲडलेडमध्ये एकाच भागात 22 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून स्थानिक यंत्रणांनी गुरुवारी रात्रीपासून नव्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही, या शब्दात या लॉकडाऊनचे समर्थन करण्यात आले आहे.

leave a reply