कोरोनाचा नवा ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट सापडला

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी कारणीभूत मानल्या जाणार्‍या कोरोनाच्या बी.1.617.2 (डेल्टा) या व्हेरियंटपासून निर्माण झालेला एक नवा स्ट्रेन सापडला आहे. डेल्टा प्लस किंवा एव्हाय.1 असे डेल्टा व्हेरियंटपासून म्युटेट झालेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला नाव देण्यात आले आहे. मात्र सध्यातरी कोरोनाच्या या नव्या प्रकारापासून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण देशात सध्या डेल्टा प्लसच्या संक्रमाणाची खूप कमी प्रकरणे समोर आली आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘डेल्टा प्लस’कोरोनाव्हायरसचे सतत म्यूटेशन होत असून नवे स्ट्रेन जन्माला येत आहेत. भारतात आता पुन्हा एक नवा स्ट्रेन आढळला आहे. याआधी गेल्यावर्षी भारतात पहिल्यांदा सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे गेल्या चार महिन्यात संक्रमण वेगाने पसरले होते. कोरोनाचा डेल्टा प्रकार हा अधिक जणांना संक्रमित करणारा असल्याचे संशोधनात समोर आले होते. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दरदिवशी कोरोनाचे चार लाखांच्या पुढे नवे रुग्ण आढळत होते. ही संख्या आता 70 हजारापर्यंत खाली आली आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात 70 हजार 421 नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच 3 हजार 921 जणांचा बळी गेला. देशात दरदिवशी बळी जात असलेल्यांची संख्या अजूनही जास्त आहे. ही चिंता वाढविणारी बाब ठरत आहे. त्याचवेळी नव्या रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी बरे होऊन घरी परतत आहेत. यामुळे रिकव्हरी दर सतत सुधारात आहे. देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घसरून 9 लाख 73 हजारांच्या खाली आली आहे. दोन महिन्यात प्रथमच अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 10 लाखांपेक्षा खाली आली आहे. मे महिन्यांच्या सुरुवातील ही संख्या 37 लाखांवर गेली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढला होता. यामुळे सध्या रुग्ण बरा होण्याचा दर 95.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच पॉझिटिव्ह दर 4.72 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

अशावेळी डेल्टा व्हेरियंटपासून तयार झालेला डेल्टा प्लस अर्थात एव्हाय.1 या नव्या व्हेरियंटची नोंद झाली आहे. दिल्लीतील ‘सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जिनोम अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’चे (आयजीआयबी) संशोधक विनोद स्कारीया यांनी याबाबत माहिती दिली आहे. डेल्टा व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये बदल होऊन बनला आहे. मात्र तो डेल्टापेक्षा अधिक संक्रमण पसरविणारा असल्याचे सध्यातरी दिसून आलेले नाही. या नव्या व्हेरियंटचे संक्रमण झाल्याची प्रकरणे जास्त पुढे आलेली नाहीत. अशाच जिनोम सिक्वेन्सच्या व्हेरियंटची प्रकरणे युरोप, अमेरिकेत जास्त समोर आली आहेत. मार्चच्या अखेरीस युरोपात या जिनोम सिक्वेन्सचा स्ट्रेन पहिल्यांदा सापडला हाता, असे स्कारीया यांनी म्हटले आहे.

leave a reply