भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन लाख ३० हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या नऊ हजारांच्या पुढे गेली आहे. रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात या साथीने ३११ जणांचा बळी गेला आणि ११,९२९ नवे रूग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या ३,२१,००० पर्यंत पोहोचली तर रविवार रात्रीपर्यंत देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ३० हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात चोवीस तासात १२० जण या साथीने दगावले आणि ३,३९० नव्या रूग्णांची नोंद झाली. तसेच राजधानी दिल्लीत ५६ जणांचा बळी गेला असून २२२४ नवे रूग्ण आढळले. देशातील दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.भारत, कोरोनाच्या रुग्णांची संख्या

देशात सध्या दिवसाला दीड लाखाहून अधिक कोरोनाच्या चाचण्या होत असून यामुळे कोरोनाचे रूग्ण सापडण्याचा वेगही वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ५६ लाख ५८ हजार चाचण्या घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. तसेच या साथीमुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ५०.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत १, ६२,३७८ रूग्ण बरे झाले आहेत. एका बाजूला ही दिलासादायक बाब समोर येत असताना दुसऱ्या बाजूला दररोज जाणारे बळी आणि सापडणाऱ्या नव्या रुग्णांमुळे चिंता वाढल्या आहेत. 

शनिवारी महाराष्ट्रात १२० रूग्ण दगावले. ह्यातील ७९ जण मुंबईतील होते. मुंबईत दिवसभरात १,३९५ नव्या रूग्णांची नोंद झाली यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ५८,१३५ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १,०७,९५८ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वात खराब स्थिती राजधानी दिल्लीत असून येथील रूग्णांची संख्या ४१,१८२ झाली आहे.  गेल्या आठवड्याभरात दिल्लीत ज्या वेगाने रूग्ण आढळत आहेत ते पाहता पुढील काही दिवसात दिल्लीतील स्थिती आणखी बिघडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर चर्चा केली. या बैठकीत कोरोना फैलावण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दिल्लीत कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार असून आपत्कालीन स्थितीसाठी विशेष विलीगिकरण कक्षात रूपांतरित करण्यात आलेले रेल्वेचे ५०० डबे तैनात करण्यात येणार आहेत.

तामिळनाडूतील रूग्णांची संख्या ४५ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. रविवारी या राज्यात १९०० नव्या रूग्णांची नोंद झाली. तसेच ३८ जणांचा बळी गेला आहे. गुजरातमध्ये चोवीस तासात २९ जण दगावले असून ५११  नव्या रूग्णांची नोंद झालेली आहे.

leave a reply