कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये तरुणांमध्ये संक्रमण वाढले – ‘आयसीएमआर’च्या प्रमुखांची माहिती

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अधिक प्रमाणात तरुण संक्रमित झाल्याचा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी केला आहे. तसेच देशात काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र परिस्थिती अजून बिकट आहे. देशातील ४२ टक्के जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त असल्याकडे भार्गव यांनी लक्ष वेधले.

Advertisement

दुसर्‍या लाटेमध्ये, संक्रमित, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, तरुण, कोरोना, चाचण्या, नवी दिल्ली, लॅबमंगळवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात ३ लाख २९ हजार नवे रुग्ण आढळले. तसेच ३ हजार ८७६ जणांचा बळी गेला. त्याचवेळी तीन लाख ५६ हजार रुग्ण बरे झाले. दीड महिन्यात पहिल्यांदाच देशात सापडलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ही दिलसादायक बाब असली, तरी काही राज्यांमध्ये संख्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी कर्नाटकात ३९,३०५ नवे रुग्ण आढळले, तसेच ५९६ जणांचा बळी गेला. पश्‍चिम बंगालमध्ये २० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच १३२ जण दगावले. केरळात ३७ हजार २९० नवे रुग्ण आढळले आणि ७९ जणांचा मृत्यु झाला. तमिळनाडूमध्ये एका दिवसात २९ हजाराहून अधिक रुग्ण सापडले असून २९८ जण दगावले आहेत.

महाराष्ट्रात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आढळलेले कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. मात्र गेल्या महिनाभराच्या तुलनेत त्यांची संख्या घटलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी सुमारे ४१ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच ७९३ जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेशात २० हजार नवे रुग्ण आढळले, तर ३०६ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत १२ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ३४७ जण दगावले. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडूमध्ये कोरोनाने सर्वाधिक रुग्ण दगावत आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाच्या नव्या लाटेत आधीच्या लाटेपेक्षा तरुणांमधील कोरोनाचे संक्रमण अधिक वाढल्याचे आयसीएमआरच्या महासंचालकांनी म्हटले आहे. कारण यावेळी तरूण मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. तसेच आताचा कोरोनाचे प्रकार अधिक संसर्ग पसरविणारे आहेत. यामुळे तरुणांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे पहायला मिळते, असे भार्गव यांनी सांगितले.

तसेच देशात कित्येक लॅबमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. लॅबमध्ये काम करणार्‍या कित्येक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असताना देशात दिवसाला १८ ते २० लाख चाचण्या होत असल्याकडे भार्गव यांनी लक्ष वेधले. ७ मे पर्यंत देशात ३० कोटी ४ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

leave a reply