कोरोनाकडे अणुहल्ल्याइतक्याच गंभीरतेने पहायला हवे

- ‘सेंटर फॉर लाँग-टर्म रेझिलियन्स’ची सूचना

लंडन – पसरविण्यात आलेली कोरोनाची साथ पुढच्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी करण्यासाठी सर्वात मोठी संधी ठरते. ही संधी साधून जगाने आगामी काळातील जैविक युद्ध, आण्विक युद्ध आणि अनियंत्रित बनत चाललेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या संकटावर मात करण्यासाठी हालचाली सुरू कराव्या, असे अभ्यासकांनी बजावले आहे. कोरोना व कोरोनासदृश्य साथींकडे जगाने आण्विक युद्धाइतकेच गंभीरपणे पहावे, असा सल्ला ‘सेंटर फॉर लाँग-टर्म रेझिलियन्स’ या अभ्यासगटाच्या तज्ज्ञांनी दिला.

कोरोनाकडे अणुहल्ल्याइतक्याच गंभीरतेने पहायला हवे - ‘सेंटर फॉर लाँग-टर्म रेझिलियन्स’ची सूचनाकोरोनाची साथ जाणीवपूर्वक पसरविण्यात आली असून हा भयंकर कटाचा भाग असल्याचे आरोप होत आहेत. यासाठी चीनला जबाबदार धरले जात आहे. मात्र असे असले तरी या साथीचा सामना करताना विकसित देशांच्या आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाल्याचे दिसत होते. महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाच्या साथीने सहा लाखाहून अधिकजणांचा बळी घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, या साथीकडे व भविष्यात समोर येणार्‍या आव्हानांच्या शक्यता मांडणारा ‘फ्युचर प्रूफ’ नावाचा अहवाल ‘सेंटर फॉर लाँग टर्म रेझिलियन्स’च्या तज्ज्ञांनी तयार केला आहे.

पुढच्या काळात समोर येऊ शकणार्‍या आव्हानांना तोंड देण्याची तयारी करण्याची संधी कोरोनाच्या साथीमुळे समोर आलेली आहे. अशी संधी आयुष्यात एकदाच मिळू शकते व त्यातून सरकारांनी योग्य तो धडा घ्यायलाच हवा. जैविक युद्धाचा सामना करण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे, हा संदेश आपल्याला कोरोनाच्या साथीतून मिळालेला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अपघात किंवा जाणीवपूर्वक विकसित केलेल्या विषाणूंमुळे साथ किती भयंकर प्रमाणात जगभरात धुमाकूळ घालू शकते, याचा अनुभव कोरोनाच्या साथीमुळे मिळत आहे. जनुकीय बदल घडवून विषाणूंचा भयंकर शस्त्रासारखा वापर होऊ शकतो, ही बाब यामुळे समोर आलेली आहे. हे तंत्रज्ञान चुकीच्या हातांमध्ये पडले तर त्यामुळे भीषण परिणामांची मालिका सुरू होईल, याचीही जाणीव जगाला या निमित्ताने झालेली बरी, असे या अहवालात बजावण्यात आले आहे.

leave a reply