देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ३६०० वर,  महाराष्ट्रात ६६१ रुग्ण 

नवी दिल्ली –  देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची  संख्या ३६०० वर पोहोचली आहे. केवळ १२ तासात ३०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून शनिवारी महाराष्ट्रातच तब्बल १४५ नवे रुग्ण आढळले, तर रविवारी सकाळी आणखी २६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ६६१ वर पोहोचली. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत गेल्या चोवीस तासात आणखी चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तसेच ५२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकट्या मुंबईत या विषाणूची लागण होऊन दगावलेल्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे.    
देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र अजूनही भारतात  समूह संसर्ग सुरु झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.  रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही दिल्लीत बेजाबदारपणे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिघी जमात या संघटनेच्या सदस्यांमुळे झाली आहे, असे आरोप होत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला होता.  तसेच देशात या साथीची लागण झालेले ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षाच्या खालचे आहेत. यातील ४२ टक्के रुग्ण हे २० ते ४० वयोगटामधील आहेत, तर  ९ टक्के रुग्ण हे २० पेक्षा कमी वयाचे आहेत, असे आरोग्य मंत्रालयाच्याच माहितीवरून स्पष्ट होते.  जगातील इतर देशांमध्ये जेथे कोरोनाचा फैलाव वेगाने सुरु आहे, तेथे ६० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे समोर आले होते. मात्र भारतात यापेक्षा वेगळी परिस्थिती दिसून येते.
देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. शनिवार एका दिवसातच राज्यात १४५ नवे रुग्ण आढळले. देशातील कोणत्याही राज्यात आतापर्यंत एका दिवसात कोरोनाच्या इतक्या रुग्णांची नोंद झालेली नाही. महाराष्ट्रात या विषाणूमुळे होणाऱ्या  मृत्यूंचा दरही देशातील सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. शनिवारी राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला. यामधील चार जण  मुंबईतील होते, तर दोन जळगांव येथील आहेत. तसेच अमरावती आणि ठाण्यातील मुंब्रा येथील एक रुग्ण दगावला. यामुळे राज्यातील या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या वाढून  ३४ झाली आहे. यातील २२ मृत्यू हे एकट्या मुंबईत झाले आहेत. 
शनिवारी राज्यात एका दिवसात रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढून ६३५ वर गेली होती. मुंबईत रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईत आतापर्यंत ३७७ रुग्ण आढळले आहेत.  राज्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण मुंबईतील असल्याचे यावरून स्प्ष्ट होते. रविवारी मुबंईतील धारावीत आणखी दोन कोरोना रुग्ण आढळले. धारावी सारख्या दाटीवाटीच्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने प्रशासन व यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे. रविवारी सकाळी आणखी २६ नवे रुग्ण राज्यात आढळले. यामुळे रुग्णांची एकूण संख्या ६६१ वर पोहोचली. यातील १७ रुग्ण हे पुण्यातील आणि चार रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. 
दरम्यान शनिवारी रात्रीपर्यंत तामिळनाडूत आणखी ७४ नवे रुग्ण आढळले. यातील ७३ हे तबलिघी जमातशी संबंधित होते.  तबलिघी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या  १०२३ जणांचे चाचणी अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि भारतातून निसटण्याचा तयारीत असलेल्या ८ मलेशियन नागरिकांना रविवारी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. 

leave a reply