पाकिस्तानमधल्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर जाईल – पाकिस्तानच्या आरोग्य यंत्रणेचा अहवाल    

इस्लामाबाद – एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ५० हजारांवर जाईल, अशी गंभीर चिंता पाकिस्तानच्या आरोग्य यंत्रणानी  व्यक्त केली. या यंत्रणेने तसा अहवाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविला. पाकिस्तानच्या जनतेने कोरोनाव्हायरसच्या साथीला घाबरु नये, असे आवाहन  करणाऱ्या  पंतप्रधान इम्रान खान  यांच्या सरकारचे यामुळे धाबे दणाणले आहेत.
पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसने बळी गेलेल्यांची संख्या ४४वर गेली आहे. तर आतापर्यंत या साथीची लागण झालेल्यांची संख्या २,२८३ वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या पंजाब प्रांतात १,१९६ जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातलेले असताना पाकिस्तानसारख्या देशात याची तीव्रता कमी कशी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण पाकिस्तानातही कोरोनाव्हायरसचा फैलाव होत असल्याचे पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मान्य केले.
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाकिस्तानमध्ये ५० हजार जणांना कोरोनाव्हायरसची लागण होईल. अतिशय गंभीर असणारया २,३९२ रुग्णांना आयसीयुची गरज भासेल. तर सात हजार गंभीर असतील.  तर ४१ हजारहून अधिक जणांना या साथीची सुरुवातीची लक्षणे असतील, असे पाकिस्तानच्या आरोग्य संस्थानी आपल्या अहवालात म्हटले. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या साथीवर चिंता व्यक्त केली.सुरुवातीला हा साधारण ताप असल्याचे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला घाबरून न जाण्याचा संदेश दिला होता. पण आता पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढल्यानंतर, इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला बजावले. आपण या साथीपासून सुरक्षित आहोत, या भ्रमात राहू नका. न्यूयॉर्ककडे पहा, तिथे सर्वाधिक श्रीमंत राहतात. तरीही ते शहर कोरोनाव्हायरसच्या कचाट्यातून सुटलेले नाही, असा संदेश इम्रान खान यांनी आपल्या जनतेला दिला.
पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढत गेला तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल, असेही ते पुढे म्हणाले. पण एकजुटीने या संकटावर मात करु शकतो, असा विश्वास इम्रान खान यांनी व्यक्त केला.  पाकिस्तानात कोरोनाव्हायरसचे  कितीतरी रुग्ण असू शकतात. पण त्यांची चाचणी केली जात नाही,  म्हणून पाकिस्तानातील या साथीच्या रुग्णांची संख्या सध्या फारच कमी असल्याचे दिसत आहे.  पण एकदा का या साथीचा सामुदायिक संसर्ग सुरू झाला की त्यानंतर पाकिस्तानला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल , असा इशारा काही पाकिस्तानी पत्रकार  देत आहेत.
पंतप्रधान इम्रान खान यांनी आधीच लॉकडाऊन करून ही साथ रोखण्याचा प्रयत्न केला असता,  तर निदान काही प्रमाणात तरी  परिस्थिती  नियंत्रणात राहू शकली असती. पण आता खूप उशीर झाला आहे अशी भीती हे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

leave a reply