फ्रान्समध्ये चोवीस तासात कोरोनाव्हायरसचे पुन्हा हजार बळी

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसने गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये १०५६ जणांचा बळी घेतला असून सलग दुसर्या दिवशी फ्रान्समध्ये हजाराहून अधिक जण दगावले आहेत. तर फ्रान्ससह युरोपमध्ये एकाच दिवसात ३५०० हून अधिक जण बळी गेल्याची माहिती युरोपिय महासंघाने दिली. दरम्यान, इटली, स्पेनच्या सरकारने आपल्या देशांतील परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला आहे.
फ्रान्समध्ये या साथीने ७५६० जणांचा बळी गेला असून सुमारे ९० हजार या साथीचे रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये ७५८८ नव्या रुग्णांची नोंद झाली. युरोपिय महासंघाने कोरोनाव्हायरसच्या साथीची माहिती देणार्या वेबसाईटने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी फ्रान्स रेल्वेचा वापर करीत आहे.
फ्रान्सप्रमाणे ब्रिटनमधील बळींची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ब्रिटनमध्ये गेले दोन दिवस सलग पाचशे बळी जात होते. पण शनिवारी एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ७०८ जण दगावले आहेत. ब्रिटनमध्ये या साथीने ४३१३ जणांचा बळी घेतला. दरम्यान, या साथीचा फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनने लॉकडाउनची घोषणा केली होती. पण ब्रिटिश जनतेमधील नाराजी पाहता फार काळ लॉकडाउन किंवा नियम टिकणार नसल्याचे दावे ब्रिटिश यंत्रणा करीत आहेत.

leave a reply