देशातील कोरोनाच्या ‘ॲक्टिव्ह केसेस’ साडेपाच लाखांच्या खाली

- कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्क्यांवर

नवी दिल्ली – देशात उपचार सुरु असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५ लाख ५० हजार इतकीच राहिली आहे. तर या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत ७६ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८३ लाखांच्या पुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असला आणि ॲक्टिव्ह केसेसची संख्या कमी होत असली, तरी दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ व मणिपूर या राज्यांमध्ये ॲक्टिव्ह केसेसची संख्या वाढली आहे.

'ॲक्टिव्ह केसेस'

देशात गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. सोमवारी ४५ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच मंगळावरी रात्रीपर्यंत जवळपास तितक्याच रुग्णांची नोंद झाल्याचे राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट होते. मंगळवारी दिल्लीत नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. दिल्लीत ६७२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळात सुमारे ७ हजार नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ५ हजार पेक्षा कमी रुग्ण आढळत असून मंगळवारी ४ हजार ९०९ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर १२० जणांचा बळी गेला. त्याचवेळी महाराष्ट्रातील ७ हजार रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण ही दिलासादायक बातमी ठरत आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्क्यांवर पोहचल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. तसेच कोरोना संक्रमणाचा एकूण पॉझिटीव्ह दर ८ टक्क्यांवरून घसरून ७.४ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत चीनच्या वुहानमधून आलेल्या विमानातून १९ जण कोरोना संक्रमित आढळले आहेत. दोन वेळा या प्रवाशांच्या चाचण्या झाल्या.युरोपीय देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काही देशांना पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. अशा स्थितीत भारताने सावध राहायला हवे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply