अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या दीड लाखांवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाव्हायरसच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचली असून, त्यात अमेरिकेतील ४४ लाख तर ब्राझीलमधील २५ लाखांहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. कोरोना साथीमुळे दगावणाऱ्यांची संख्या ६ लाख ६७ हजारांवर गेली असून, अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे दीड लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. साथीचे मूळ असणाऱ्या चीनमध्येही रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असून गेले दोन दिवस सलग १००हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरस साथीचा फैलाव अधिकच वाढत असल्याचे नव्या आकडेवारीतून समोर येत आहे. अमेरिकेसह ब्राझील, ब्रिटन, रशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया व चीन या देशांमध्ये रुग्णांची तसेच बळींची संख्या वाढताना दिसत आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोना साथीत १,४६१ जण दगावले असुन बळींची संख्या दीड लाखांवर गेली आहे. गेल्या ११ दिवसात अमेरिकेत कोरोना बळींच्या संख्येत १० हजारांहून अधिक जणांची भर पडल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

ब्राझीलमधील रुग्णांची संख्या २५ लाख ५० हजारांहून अधिक झाली असून दगावणाऱ्यांची एकूण संख्या ९०,१३४ आहे. ब्रिटनमधील बळींची संख्या ४६ हजारांनजिक पोहोचली असून युरोपमधील एकूण बळी १ लाख ८१ हजारांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये इराणमधील रुग्णांची संख्या तीन लाखांवर गेल्याची माहिती सरकारने दिली आहे. आग्नेय आशियातील इंडोनेशिया व फिलिपाईन्समध्ये बुधवारी प्रत्येकी एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियातही २४ तासात सातशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या १६ हजारांवर गेली आहे.

कोरोना साथीचे मूळ असणार यात चीनमध्येही पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले. गेले दोन दिवस चीनमध्ये सलग १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून हॉंगकॉंगमध्येही फैलाव वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

leave a reply