कोरोनाव्हायरसमुळे देशात चोवीस तासात १,०४५ जणांचा बळी

महाराष्ट्रात १७,४३३ नवे रुग्ण

नवी दिल्ली – गेल्या २४ तासात देशात कोरोनाव्हायरसमुळे १,०४५ जणांचा बळी गेला असून या महामारीने दगावणार्‍यांची एकूण संख्या ६६,३३३ वर पोहोचली आहे. बुधवारी सकाळपर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत ७८,३५७ नव्या रुग्णांची भर पडली असून देशात ३७ लाख ६९ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील निम्म्याहून अधिक कोरोनाचे बळी आणि रुग्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यातील असल्याचे समोर आले आहे. बुधवारी महाराष्ट्रात २९२ जणांचा बळी गेला तर १७,४३३ नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी मुंबईत ३४ जणांचा बळी गेला असून १,६२२ नवे रुग्ण आढळले आहेत.

१,०४५ जणांचा बळी

सोमवारपासून देशात ‘अनलॉक-४’ सुरु झाला आहे. पण देशातला कोरोनाव्हायरसचा कहर थांबलेला नाही. गेल्या २४ तासात देशात या साथीने १,०४५ जणांचा बळी गेला असून ७८ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २९ लाख जण बरे झाले असून रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले. बुधवारी महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळले.

१,०४५ जणांचा बळी

आंध्रप्रदेशमध्ये ७२ जणांचा बळी गेला असून १०,३९२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकात गेल्या २४ तासात ११३ जणांचा बळी गेला असून ९,८६० नवे रुग्ण आहेत. बंगळुरुमध्ये सर्वाधिक जास्त ३,४२० रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाव्हायरसचे निम्मे बळी आणि रुग्ण या तीन राज्यातील असल्याचे समोर आले आहे. तर गोव्यामध्ये बुधवारी कोरोनाव्हायरसचे ६३६ नवे रुग्ण आढळले. गोव्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. तर पुण्याने कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये नवी दिल्लीला मागे टाकले आहे.

leave a reply