कोरोनाव्हायरसमुळे देशात चोवीस तासात १५ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३००० च्या पुढे

कोरोनाव्हायरसमुळे देशात चोवीस तासात १५ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३००० च्या पुढे

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसमुळे चोवीस तासात १५ जणांचा मृत्यू झाला, तर या विषाणूची लागण झालेले ७०० नवे रुग्ण आढळले. केवळ दोन दिवसात देशात कोरोनाचे १००० नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ३००० च्या पुढे गेली आहे. गेल्या चार दिवसात नोंद झालेले ६० टक्के नवे रुग्ण हे दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गेल्या दोन दिवसात या कार्यक्रमात सहभाग झालेले ६४७ रुग्ण आढळले आहेत.

देशात या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. रविवार २९ मार्च रोजी देशात या साथीच्या रुग्णांची संख्या १००० पर्यंत पोहोचली होती. मात्र गेल्या केवळ सहा दिवसात रुग्ण संख्या वाढून ३०००t च्या पुढे गेली आहे. सर्वच राज्यांमध्ये या साथीच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्येही सर्वात जास्त नवे रुग्ण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली आणि महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत.

तामिळनाडूत शुक्रवारच्या एका दिवसात १०२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तामिळनाडूतील रुग्णांची संख्या ४१६ वर पोहोचली. केवळ चार दिवसात तामिळनाडूतील या साथीच्या रुग्णांची संख्या ५० वरून ४०० च्या पुढे गेली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे दिल्लीतील तबलिघी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शुक्रवारी दिल्लीत एका दिवसात ९३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन जणांचा मृत्यू झाला. यापैकी ७७ रुग्ण हे तबलिघी जमातशी संबंधीत आहेत.

तेलंगणातही या साथीच्या ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. येथेही सापडलेले बहुतांश नवे रुग्ण हे दिल्लीतील तबलिघी जमातच्या कार्यक्रमातून परतलेले होते. महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात ६७ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या ४९० पर्यंत पोहोचली आहे. यातील ५३ रुग्ण हे महामुंबई परिक्षेत्रातील आहेत. महाराष्ट्रात नोंद झाल्येल्या नव्या रुग्णांपैकी सात रुग्ण हे दिल्लीतील धार्मिक कार्क्रमात सहभागी झाले होते.

देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ६२ झल्याचे व रुग्णांची संख्या २ हजार ५४७ पर्यंत पोहचल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. मात्र राज्यांकडून जारी करण्यात आलेली माहिती व विविध वृत्त अहवालानुसार शनिवारी सकाळपर्यंत या साथीच्या बळींची संख्या ८० वर पोहोचली आहे, तर रुग्ण संख्या तीन हजारच्याही पुढे गेली आहे. चोवीस तासात ७०० हून अधिक नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

leave a reply