जगभरात एकाच दिवसात कोरोनाव्हायरसचे सहा हजार बळी

वॉशिंग्टन/पॅरिस – जगभरातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या गेल्या चोवीस तासात ५,९३२ ने वाढली तर दिवसभरात या साथीचे ४५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिका, फ्रान्स या देशांमध्ये एकाच दिवसात हजाराहून अधिक जण दगावले. तर स्पेन, इटली, ब्रिटन या युरोपिय देशांमध्ये परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, या साथीबरोबर काही युरोपिय देशांमध्ये असंतोष वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अमेरिकेत कोरोनाव्हायरसने दगावणार्यांची संख्या ७४०८ वर पोहोचली असून गेल्या चोवीस तासात १४८० जणांचा बळी गेला आहे. तर या एका दिवसात अमेरिकेत तीस हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती हॉप्किन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. सध्या अमेरिकेत २,७७,५२२ रुग्ण असून बारा हजार जणांना उपचारांती घरी सोडल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर केले.

तर गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये ११२० जणांचा बळी गेला असून सलग दुसर्या दिवशी फ्रान्समध्ये हजाराहून अधिक बळी गेले आहेत. गेले दोन दिवस फ्रान्समध्ये इटली आणि स्पेनपेक्षाही अधिक बळी जात असल्यामुळे येथील जनता हवालदील झाली आहे. फ्रान्समधील ७४०० नर्सिंग होममध्ये या साथीने बळी गेलेल्यांची माहिती संकलित केल्यानंतर फ्रान्समधील एकूण बळींची संख्या ६५०७ वर पोहोचल्याचे समोर आले आहे.

स्पेनमध्ये सलग दुसर्या दिवशी ९०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. स्पेनच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या साथीने एका दिवसात ९३२ जण दगावले. याबरोबर कोरोनाव्हायरसमुळे स्पेनमध्ये जवळपास ११ हजार जणांनी आपले प्राण गमावले असून स्पेनमध्ये या साथीचे १,१९,१९९ रुग्ण आहेत. तर गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये ७६६ जणांचा बळी गेला. इतर देशांच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक १४,६८१ जण दगावले आहेत.

कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या ब्रिटनमध्येही गेल्या चोवीस तासात ६८४ जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनमध्ये एकूण बळींची संख्या ३६०५ वर गेली असून, या क्रमवारीत इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्सनंतर आता ब्रिटनची नोंद होत आहे. तर ब्रिटनमध्ये ३८ हजाराहून अधिक जणांना या साथीची लागण झाली असून ब्रिटिश सुरक्षा यंत्रणा लॉकडाउनचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईच्या तयारीत आहे.

दरम्यान, स्वीडनसारख्या देशाने आपल्या नागरिकांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालण्याचे टाळले. शेजारी युरोपिय देशांमधील परिस्थिती हाताबाहेर जात असताना, आपल्या देशामध्ये लॉकडाउनचा अभाव आणि अन्य उपाययोजना नसल्यामुळे स्वीडनचे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे इतर युरोपिय देशांप्रमाणे आपल्या देशातील परिस्थिती चिघळेल, अशी चिंता स्वीडनच्या जनतेला सतावित आहे. तर लॉकडाउनखाली गेलेल्या इटली, फ्रान्समध्ये जनतेचा असंतोष वाढू लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

इटलीच्या दक्षिणेकडील भाग गेल्या चार आठवड्यापासून लॉकडाउनमध्ये असून या भागातील गरीबांकडील पैसे संपले असून येथे अन्नासाठी चोरी आणि लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. परिथिती अशीच कायम राहिली तर विकसित मानल्या जाणार्या देशांमध्येही लूटमार वाढत जाईल व सामाजिक असंतोषाचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या भीतीमुळे अमेरिकेसारख्या देशातही बंदुकांच्या मागणी व खरेदीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

leave a reply