कोरोनाव्हायरसचा युरोपमध्ये हाहाकार

रोम – गेल्या चोवीस तासात युरोपिय देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे दोन हजाराहून अधिक बळी गेले आहेत. तर दिवसभरात युरोपमध्ये या साथीची लागण झालेल्या जवळपास पंधरा हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. इटली, स्पेन, फ्रांस या तीन देशांमधील परिस्थिती अतिशय दारूण बनली असून स्पेनमध्ये एका दिवसात ७६९ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, या साथीतून लवकर सुटका शक्य नसल्याची हताश प्रतिक्रीया फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिपे यांनी दिली.

स्पेनच्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात देशात ७६९ जणांचा बळी गेला आहे. तर एकट्या स्पेनमध्येच कोरोनाचे संक्रमण झालेले किमान आठ हजार रूग्ण आढळले आहेत. एका दिवसातील या घडामोडीनंतर स्पेनच्या सरकारने १२ एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली. स्पेनमध्ये या साथीत ४,८५८ जणांचा बळी गेला.

तर कोरोनाव्हायरसमुळे युरोपमधील सर्वाधिक बळी गेलेल्या इटलीत गेल्या चोवीस तासात ७१२ जण दगावले. या साथीत इटलीमध्ये ८,२१५ जणांचा बळी गेला असून यामध्ये एकट्या लॉम्बार्डी प्रांतातील ४,८६१ जणांचा समावेश आहे. इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ऐंशी हजाराहून अधिक असून यापैकी ३,६१२ जण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत.

फ्रान्समध्ये एका दिवसात या साथीने ३६५ जणांचा बळी घेतला असून फ्रान्समधील एकूण बळींची संख्या १,६९६ वर पोहोचली आहे. फ्रान्समधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चार हजारांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिपे यांनी देशातील या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. ‘कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात फ्रान्स पूर्णपणे अडकला असून पुढील काही महिने यातून सुटका शक्य नाही’, अशा हताश शब्दात पंतप्रधान फिलिपे यांनी फ्रेंच जनतेला संकटाची जाणीव करुन दिली.

इटली, स्पेन, फ्रान्स पाठोपाठ ब्रिटनमधील परिस्थिती चिघळत चालली आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये ११३ जणांचा बळी गेल्याचे जाहीर करण्यात आले. तर गेल्या चोवीस तासात ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसचे संक्रमण झालेल्यांच्या संख्येत दोन हजारांची वाढ होऊन या देशात एकूण ११,६५८ रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply