ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाव्हायरसची लागण

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे .याआधी ब्रिटनच्या आरोग्यमंत्री मॅट हानकोक’ यांना या साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही या साथीची लागण झाल्याची बातमी आली होती.

ब्रिटनच्या पंतप्रधानांना या साथीची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सोशल मीडियावर संदेश पाठवला. ब्रिटनचे पंतप्रधान लवकरच या साथीवर मात करतील , असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुढच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण देशातील घडामोडींची माहिती घेऊ असे सांगून पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या प्रकृतीचा देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असा संदेश दिला आहे.

याआधी स्पेनच्या उपपंतप्रधानांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची बातमी आली होती. इराणचे उपराष्ट्राध्यक्ष तसेच उपआरोग्यमंत्री व इराणी संसदेच्या सदस्यांनाही या साथीने ग्रासल्याचे उघड झाले होते.

leave a reply