देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखांवर

नवी दिल्ली,  (वृत्तसंस्था) – देशात कोरोनामुळे चोवीस तासात १५७ जणांचा बळी गेला, तर ५,२४२ नवे रुग्ण आढळले. यामुळे सोमवारच्या सकाळपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ९६,१६९ पर्यंत पोहोचली होती. सोमवारी रात्रीपर्यंत देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याचे स्पष्ट होत आहे.  दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाने ५१ जण दगावले, तर २,०३३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरी या साथीचे हॉटस्पॉट बनलेल्या महापालिकांच्या क्षेत्रात नियम शिथिल केले जाणार नाहीत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशही  राज्ये व येथील प्रमुख शहरे देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहेत. चाचण्यांची संख्या वाढली असताना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या सोमवारी ११ मे रोजी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७० हजारावर पोहोचली होती. मात्र आठवड्याभरात रुग्णसंख्या एक लाखांच्याही पुढे गेली आहे. ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आठवडाभराच्या अवधीत आढळून आले आहेत. देशात सध्या दरदिवसाला लाखाहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत. मात्र देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. रविवारी सकाळपर्यँत ३६,८२४ जण बरे झाले आहेत. देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ३८.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

देशात सर्वाधिक चिंताजनक स्थिती महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, मालेगाव या महापालिका क्षेत्रांमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. राज्यात गेल्या चार दिवसात २३० जणांचा बळी गेला असून ७,५६२ नवे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी २,०३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत चोवीस तासात २३ जणांचा बळी गेला, तर १,१८५ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१ हजारांच्या पुढे गेली आहे.  सोमवारी राज्यात या साथीने दागवलेल्यांची संख्या १२४९ वर पोहोचली. यामध्ये ७२७ जण मुंबईतील होते. राज्यात आतापर्यंत १२७३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६०२ पोलीस मुंबईतील आहेत. 

दरम्यान, सोमवारी गुजरातमध्ये ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ३६६ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ३१ जण अहमदाबादमध्ये दगावले आहेत, तर २६३ नवे रुग्ण येथे सापडले आहेत. मुंबईनंतर अहमदाबाद शहर देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने १० हजारांची संख्या पार केली. सोमवारी दिल्लीत २९९ नवे रुग्ण आढळले. मात्र दिल्लीत या साथीचा होणारा मृत्यूदर कमी आहे. आतापर्यंत दिल्लीत या साथीमुळे १६० जण दगावले आहेत. 

leave a reply