तालिबानने भारताला दिलेल्या धमकीचे पाकिस्तानात स्वागत

काबुल, (वृत्तसंस्था) – भारत हा अफगाणिस्तानचा मित्र देश आहे आणि भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित असून यापुढेही भारत अफगाणिस्तानच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी  महत्त्वाची भूमिका पार पाडेल, हा आमचा विश्वास आहे’, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. तालिबानने भारतावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानच्या सरकारने भारताचे महत्त्व अधोरेखित केले. भारताने अफगाणिस्तानच्या विकासात नकारात्मक भूमिका बजावल्याचा आरोप तालिबानचा कतारमधील कार्यालयाचा प्रमुख ‘शेर मोहम्मद अब्बास   स्तानिकजाई’ याने केला होता. तसेच स्तानिकजाई याने भारताला हल्ल्याच्या धमक्याही दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि तालिबानमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका स्वीकारणाऱ्या स्तानिकजाई याने माध्यमांशी बोलताना भारतावर दोषारोप केले. गेली चाळीस वर्षे भारत अफगाणिस्तानात नकारात्मकता पसरवीत असल्याचा ठपका स्तानिकजाई याने ठेवला. गेली दोन दशके भारताने अफगानिस्तानातील देशद्रोही व भ्रष्ट सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर भारताने लोकनियुक्त नाही तर अमेरिकेने निवडलेल्या सरकारला सहकार्य केल्याचे स्तानिकजाई याने म्हटले आहे. लवकरच तालिबान भारताच्या विरोद्धात जिहाद सुरू करील, अशी धमकी तालिबानच्या या नेत्याने दिली आहे.

तालिबानने भारतावर केलेल्या आरोपांना  अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये फार आधीपासून सहकार्य होते व हे आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित आणि एकमेकांविषयी असलेल्या आदरावर विकसित झाले आहे. भारताबरोबरच्या सहकार्याचे अफगाणिस्तानने नेहमीच स्वागत केले असून यापुढे भारत अफगाणिस्तानातील शांतीचर्चेत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्‍वास अफगाणिस्तानचा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ग्रॅन हेवाड यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलजाद यांनी भारताचा दौरा करून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर  तालिबानने भारताला ही धमकी दिली आहे. यावेळी खलिलजाद यांनी भारताने तालिबानशी थेट चर्चा करावी, असे सुचविले होते.

तालिबान अजूनही पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करीत असून शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजाई याने भारताला दिलेली धमकी, यामागे पाकिस्तानच असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी तालिबानने भारताला दिलेल्या धमकीचे पाकिस्तानात काही जणांनी स्वागत केले आहे. काही पाकिस्तानी पत्रकारांनी तालिबानचा विरोध भारताला महाग पडेल, असे दावे केले आहेत.

leave a reply