कोरोनाव्हायरसच्या लसीवरुन वाद पेटला

वॉशिंग्टन/पॅरिस,  (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३,०४,७९५ वर पोहोचली असून सतरा लाखांहून अधिक जण या साथीतून बरे झाले आहेत. पण अजूनही जगभरात या साथीच्या  रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून पुढील पाच वर्षे ही साथ कायम राहणार असल्याचा इशारा दिला जात आहे. या साथीवरील लस शोधण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत फ्रान्समधील ‘सनोफी’ कंपनीने आपण विकसित करीत असलेल्या कोरोनाच्या लसीवर अमेरिकेचा अधिकार असेल असे सांगितल्यामुळे नवा वाद पेटला आहे.

गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे १,७५४ जण दगावले असून या देशातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ८७ हजारांच्याही पुढे गेली आहे. जगभरातील जवळपास एक चतुर्थांश बळी आणि एक तृतियांश रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. तर युरोपमध्ये या साथीने आतापर्यंत एकूण  १,६०,००० हून अधिक जण दगावले आहेत. यापैकी ब्रिटनमध्ये ३४ हजारांहून अधिक तर इटलीत ३१,३६८ आणि स्पेनमधील २७,५०० हून अधिक जणांचा या साथीत बळी गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या साथीत दगावणाऱ्यांच्या संख्येत घट दिसत असली तरी या साथीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात ९५,५१९ नवे रुग्ण सापडले आहेत. एक दिवस आधीच्या तुलनेत गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सात हजार नव्या रुग्णांची भर पडली. सध्या जगभरात या साथीचे ४५,६९,०७६ रुग्ण आहेत. अमेरिकेत पुन्हा एका दिवसात २५ हजार रुग्ण सापडले असून रशियात १०,५९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दक्षिण कोरियामध्ये या साथीची दुसरी लाट आली असून गेल्या चोवीस तासात २९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर चीनमध्ये प्राथमिक लक्षणे न दाखविणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ७५० वर गेली आहे. या साथीचे उगमस्थान ठरलेल्या वुहान शहरात या साथीच्या दुसऱ्या लाटेचे २० हून अधिक रुग्ण आढळल्यानंतर चीनने या शहरात पुन्हा चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत चीनने वुहानमधील तीस लाख जणांची चाचणी घेतल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, कोरोनाची साथ पुढील पाच वर्षे तरी टिकून राहील, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केला आहे. या साथीवर लस शोधण्यासाठी जगभरातील सुमारे शंभर कंपन्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर ही लस तयार होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल, असे बोलले जाते. पण त्याआधीच फ्रान्समधील ‘सनोफी’ कंपनीने आपण तयार करीत असलेल्या या साथीच्या लसींवर अमेरिकेचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन कंपनीने सनोफीमध्ये मोठी गुंतवणूक केल्यामुळे या लसीवर अमेरिकेचा अधिकार असल्याचा खुलासा केला आहे. मात्र सनोफीने दिलेल्या या विधानावर युरोपिय महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

leave a reply