वर्षाखेरीपर्यंत कोरोनाची लस तयार होईल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रविवारी जगभरात कोरोनाव्हायरसमुळे ३४४० जण दगावले असून गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच या साथीच्या बळींच्या संख्येत घट दिसली आहे. पण कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि या साथीवरील लस शोधण्यात मिळत असलेल्या अपयशामुळे चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्ष अखेरीपर्यंत या साथीवर लस तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे २,४८,५५८ जणांचा बळी गेला असून गेल्या चोवीस तासात ३४४० जण या साथीने दगावले आहेत. यापैकी अमेरिकेत गेल्या चोवीस तासात ११२६ तर युरोपमध्ये ११९३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकी अभ्यासगटाने दिली. तर युरोप वगळता आशियाई देशांमध्ये सहाशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. महिन्याभरात पहिल्यांदा एका दिवसाभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत घट झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जाते.

असे असले तरी, कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही, याकडे जॉन हॉप्किन्स विद्यापीठ लक्ष वळवित आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात या साथीच्या ८१,१५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी अमेरिकेत २६,६१३ नवे रुग्ण आढळले असून या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ११,८८,४२१ वर गेली आहे. तर रशियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे. रशियात या साथीचे रुग्ण १,४५,००० वर गेले असून राजधानी मॉस्को रशियासाठी प्रमुखकेंद्र ठरत आहे.

दरम्यान, येत्या वर्ष अखेरीपर्यंत कोरोनावर लस तयार होईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. लाखो जणांचे बळी घेणाऱ्या या साथीची लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. काही संशोधकांनी या विषाणूवर लस शोधण्यात दीड वर्ष लोटेल, असा दावा केला आहे. तर काही विश्लेषकांनी कोरोनावर लस शक्यच नसून या परिस्थितीतच जगावे लागणार असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा समाधानकारक ठरत आहे

leave a reply