भारताशी वैर असलेल्या देशांकडे ‘सायबर आर्मी’ आहे

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

‘सायबर आर्मी'नवी दिल्ली – “ज्यांना भारत सुरक्षित असलेला पाहवत नाही,अशा देशांनी भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे सायबर हल्ले चढविले आहेत. अशा देशांनी आपली ‘सायबर आर्मी’ तयार केली आहे. पण याचा सामना करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे सज्ज आहे. सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखण्यासाठी भारत आपली क्षमता अधिकाधिक विकसित करीत आहे”, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. देशाची सायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेली आहे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्र्यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.

‘सायबर सेफ्टी अँड नॅशनल सिक्युरिटी’ या विषयावरील परिसंवादात केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. देशाची 80 कोटी जनता ऑनलाईन माध्यमाशी जोडलेली आहे, असे सांगून शहा यांनी त्याचे स्वागत केले. ही फार मोठी संख्या ठरते. ज्या प्रमाणात ही संख्या वाढत जाईल, त्याच प्रमाणात डाटाचे दर कमी होत जातील. देशात ही डिजिटल क्रांती हो होत असताना, सायबर सुरक्षेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे, याची जाणीव गृहमंत्र्यांनी करून दिली.

‘सायबर आर्मी'देशात सायबर क्षेत्रातील घोटाळे व गैरव्यवहारांचे प्रमाण पुढच्या काळात वाढत जाईल. म्हणून सायबर सुरक्षेच्या आघाडीवर आपल्याला अधिक तयारी करावी लागेल. कारण सायबर सुरक्षा ही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेली बाब आहे. सायबर क्षेत्र देशाच्या विकासासाठी फार मोठे योगदान देत आहे. म्हणूनच सायबर सुरक्षेला केंद्र सरकारकडून अतिशय महत्त्व दिले जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपल्यासाठी सायबर हल्ले ही काही नवी बाब ठरत नाही. याआधीही आपल्या देशावर सायबर हल्ले झालेले आहेत. मालवेअरचे हल्ले, इंटरनेट फिशिंग आणि देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील संवेदनशील ठिकाणांवरील सायबर हल्ले, ऑनलाईन घोटाळे, अशा प्रकारचे गुन्हे पुढच्या काळात वाढू शकतात. त्याचवेळी नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’ अर्थात व्यक्तीगत जीवनाबाबतची गोपनीयतेचा भंग सायबर हल्ल्यांद्वारे केला जाऊ शकतो. म्हणूनच प्रत्येकाने आपली माहिती सुरक्षित राखण्यासाठी अधिक दक्षता घ्यायला हवी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले.

पुढच्या काळात डाटा आणि इर्न्फोमेशन अर्थात माहिती या दोन गोष्टी जबरदस्त आर्थिक शक्ती ठरणार आहेत. म्हणूनच त्यांच्या सुरक्षेसाठी आल्याला अधिक सतर्क रहावे लागेल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला.

आपल्या देशात 2012 साली 3,377 सायबर गुह्यांची नोंद झाली. तर 2020 साली ही संख्या 50 हजारावर गेली. हे नोंद झालेले सायबर गुन्हे आहेत. नोंद न झालेल्या सायबर गुन्हे लाखाच्याही पुढे असू शकतात, याची जाणीव केंद्रीय गृहमंत्र्यांनी करून दिली. अशा परिस्थितीत भारत सरकारने जगातील सर्वाधिक सुरक्षित सायबर क्षेत्र विकसित करण्याचे ध्येय आपल्यासमोर ठेवलेले आहे, असे सांगून गृहमंत्री अमित शहा यांनी या आघाडीवर जनतेला आश्वस्त केले आहे.

leave a reply