‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनमधील उद्योगक्षेत्राला फटका

उद्योगक्षेत्राला फटका

बीजिंग/शांघाय – चीनकडून कोरोनाची साथ रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे उद्योगक्षेत्रातील नाराजी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. चीनमध्ये सक्रिय असणाऱ्या परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक तसेच मनुष्यबळ कमी करण्याचे संकेत दिले आहेत. तर चीनमधील अनेक छोट्या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे चीनमध्ये बेरोजगारीचा मुद्दा गंभीर रुप धारण करण्याची शक्यता असून आर्थिक विकासदरालाही फटका बसेल, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

गेल्या काही महिन्यात चीनच्या विविध प्रांतांसह आघाडीच्या शहरांमध्ये कोरोनाचे वारंवार उद्रेक होत असल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शांघायमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. हा नवा उद्रेक अजूनही पूर्ण थांबलेला नसून आर्थिक व व्यापारी केंद्र असणाऱ्या शांघायसह राजधानी बीजिंगमध्येही नवे रुग्ण आढळत आहेत. यापूर्वीच्या कोरोना साथीमध्ये चीनच्या सत्ताधारी राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’ची अंमलबजावणी केली होती. यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती करण्यात आली आहे.

उद्योगक्षेत्राला फटकामात्र चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून राबविण्यात येणाऱ्या या धोरणाविरोधात सामान्य नागरिकांसह उद्योगक्षेत्राकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या धोरणामुळे चीनमधील अनेक तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. निर्बंध किती काळ राहणार याची नीट कल्पना नसल्याने अनेक छोट्या व मध्यम उद्योगांनी नोकऱ्यांच्या संख्येत कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्या मिळणे अधिकच कठीण बनले आहे. स्थानिक उद्योगांबरोबरच परदेशी कंपन्यांनीही मनुष्यबळ कमी करण्याचे संकेत दिले आहेत. टेस्लासारख्या आघाडीच्या कंपनीने नव्या नोकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे तीन मेळावे रद्द केले आहेत.

उद्योगक्षेत्राला फटकापरदेशी उद्योगांना चीनमध्ये काम करणाऱ्या विदेशी मनुष्यबळाचाही तुटवडा भासू लागला आहे. चीनमधील कठोर निर्बंधांमुळे मायदेशी परतलेल्या अनेक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी चीनमध्ये माघारी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांना कुशल कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा भासण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी तसेच युरोपिय गटांनी केलेल्या सर्वेक्षणात परदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडण्यावर तसेच गुंतवणूक कमी करण्यावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे समोर येत आहे.

चीनमधील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ने जवळपास 167 कंपन्यांशी संपर्क साधला. त्यातील 99 टक्के कंपन्यांनी ‘झीरो कोविड पॉलिसी’चा फटका बसल्याची कबुली दिली. 50 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी महसूल कमी होणार असल्याचे संकेत दिले तर 36 टक्के कंपन्यांनी गुंतवणुकीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 60 टक्के कंपन्यांनी उत्पादनात कपात करीत असल्याची माहिती दिली. 23 टक्के युरोपिय कंपन्यांनी नजिकच्या काळात चीनमधून बाहेर पडण्याचा दावा केल्याचे, ‘ईयू चेंबर ऑफ कॉमर्स’ने म्हटले आहे.

leave a reply