दहशतवादाचा पुरस्कार व बचाव करणाऱ्या देशांना जबाबदार धरायलाच हवे

- पाकिस्तानसह चीनला पंतप्रधानांनी फटकारले

दहशतवादाचा पुरस्कारनवी दिल्ली – दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या व दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या देशांना त्याची किंमत चुकती करण्यास भाग पाडायलाच हवे, अशी मागणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान व चीनवर सडकून टीका केली. थेट नामोल्लेख टाळून पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेत पाकिस्तानसह चीनचेही वाभाडे काढले. काही देशांकडून दहशतवाद्यांना मिळणारे सहाय्य आणि संरक्षण यामुळे दहशतवाद फोफावत आहे. अशा देशांना त्यांच्या कारवायांसाठी जबाबदार धरायलाच हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत ठासून सांगितले. सुमारे ७५ देशांचे प्रतिनिधी व ४५० शिष्टमंडळे असलेल्या या परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तान व चीनवर केलेली टीका या देशांना अस्वस्थ करणारी ठरत आहे.

दहशतवादाच्या गंभीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधले जाण्यापूर्वी भारताने भीषण दहशतवादी हल्ले सहन केले आहेत. भारतावर आघात करण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ वारंवार दहशतवादी हल्ले घडविण्यात आले. पण भारताने दहशतवादाचा मोठ्या शौर्याने मुकाबला केला. काही देश दहशतवादाचा वापर आपल्या परराष्ट्र धोरणासाठी करीत आहेत. दहशतवादाला राजकीय संरक्षण देऊन त्याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न या देशांकडून सुरू असतात. मात्र दहशतवादी हल्ला म्हणजे स्वातंत्र्य, लोकशाही व सुसंस्कृत समाजावरचा हल्ला ठरतो. कुठल्याही परिस्थितीत त्याचे समर्थन करता येऊ शकत नाही. म्हणूनच दहशतवादाचे उदात्तीकरण करणारे, त्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना पैसे पुरवून दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या देशांना या कारवायांसाठी जबाबदार धरायलाच हवे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

दहशतवाद्यांचा बचाव करणाऱ्या देशांना यात यश मिळणार नाही, याची दक्षता घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी ठरते. दहशतवाद्यांमध्ये चांगले आणि वाईट अशी तफावत करता येत नाही, असे सांगून पंतप्रधानांनी दहशतवादविरोधी लक्षात सहभागी होण्याचे सर्वच देशांना आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांना पैसे पुरविले जात असल्याची गंभीर बाब देखील यावेळी पंतप्रधानांनी लक्षात आणून दिली. डार्क नेट, खाजगी चलने यांच्या उदयामुळे दहशतवादाला अधिक बळ मिळत आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना रोखण्यासाठी खाजगी क्षेत्राचेही सहाय्य घ्यायला हवे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधानांनी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानसह चीनवर दहशतवादाचे पुरस्कर्ते देश म्हणूनच चढविलेला हल्ला माध्यमांमध्ये गाजत आहे. चीनने या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. भारताने दहशतवादाच्या विरोधात स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चीनने या परिषदेकडे पाठ फिरविल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना व त्यांच्या म्होरक्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखून चीनने भारताला चिथावणी दिली होती. ही बाब नेमक्या शब्दात मांडून पंतप्रधानांनी दहशतवादी कारवाया करणाऱ्यांबरोबरच, त्यांचा बचाव करणारेही दहशतवादाला तितकेच जबाबदार असल्याचे या परिषदेत बजावले. त्यामुळे चीनबरोबरील द्विपक्षीय सहकार्यात आता दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर असेल, असे संकेत पंतप्रधानांनी याद्वारे दिले आहेत.

leave a reply