देश पुलवामाचा हल्ला कधीही विसरणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

विसरणार नाही

चेन्नई – चेन्नई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीआरडीओ’ने विकसित केलेला स्वदेशी ‘अर्जुन एमके-१ए’ रणगाडा राष्ट्राला अर्पण केला. लष्कराला लवकरच ११८ रणगाडे मिळणार असून यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल. तामिळनाडूमध्ये तयार करण्यात आलेले अर्जुन रणगाडे देशाच्या उत्तर सीमेचे रक्षण करतील, यातून भारताचे ऐक्य प्रदर्शित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचवेळी सीआरपीएफच्या ४० जवानांचा बळी घेणार्‍या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसर्‍या स्मरणदिनी पंतप्रधानांनी देश हा हल्ला कधीच विसरणार नाही, असे म्हटले आहे.

Advertisement

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना, भारतीय संरक्षणदलांनी एकाच वेळी दोन आघाड्यांवरील युद्धांची सज्जता ठेवलेली आहे. लडाखच्या एलएसीजवळ चीनने रणगाडे तैनात करून भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. या क्षेत्रात रणगाडे तसेच रणगाडेभेदी क्षेपणास्त्रे तैनात करून भारताने चीनला ‘जशास तसे’ उत्तर दिले. या पार्श्‍वभूमीवर, लष्कराला ११८ ‘अर्जुन एमके-१ए’ रणगाडे मिळत आहेत. स्वदेशी बनावटीच्या या आधुनिक रणगाड्यांमुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल.

डीआरडीओने विकसित केलेला ‘अर्जुन एमके-१ए’ अत्याधुनिक रणगाडा मानला जातो. या ११८ रणगाड्यांसाठी ८४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने याच्या लष्करातील सहभागाला नुकतीच मंजुरी दिली होती. याआधी भारतीय लष्करात दाखल करण्यात आलेल्या अर्जुन रणगाड्यांपेक्षा ‘अर्जुन एमके-१ए’ अधिक अद्ययावत असून यात सुचविण्यात आलेल्या ७६ सुधारणा करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस याच्या चाचण्या पार पडल्या होत्या.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडविला होता व या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्याच्या दुसर्‍या स्मरणदिनी ‘अर्जुन एमके-१ए’ भारतीय लष्करात सहभागी होत आहे. पुलवामाच्या त्या शहीद जवानांचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्मरण केले व या हल्ल्याचा देशाला कधीही विसर पडणार नाही, अशी ग्वाही दिली. या जवानांच्या पराक्रमाची गाथा देशाच्या कित्येक पिढ्या गात राहतील, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधानांनी काढले.

देशाचे सार्वभौमत्त्व आणि मायभूमीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे, हे भारतीय संरक्षणदलांनी वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. सार्‍या देशाला त्याचा अभिमान वाटतो, असे सांगून पंतप्रधानांनी संरक्षणदलांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी संरक्षणदलांची पूर्ण सिद्धता असल्याचे सांगून चीन व पाकिस्तानला योग्य तो संदेश दिल्याचे दावे माध्यमांकडून केले जात आहेत. विशेषतः जम्मू व काश्मीरमध्ये घातपात घडविण्याचे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेचे आणखी एक कारस्थान उधळले गेल्याचे उघड झाल्यानंतर, पंतप्रधानांनी दिलेल्या या इशार्‍याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply