भूमध्य सागरी क्षेत्रातील देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर राखणे आवश्यक

- इजिप्त, ग्रीस व सायप्रसची मागणी

भूमध्य सागरीअथेन्स/कैरो – भूमध्य सागरी क्षेत्रातील देशांचे सार्वभौमत्त्व व सागरी क्षेत्रातील सार्वभौम हक्कांचा आदर राखला जायला हवा, अशी आग्रही मागणी इजिप्त, ग्रीस व सायप्रसने संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. शनिवारी ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये तिन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. त्यात झालेल्या चर्चेनंतर भूमध्य सागरी क्षेत्रासंदर्भातील मागणी करतानाच, तीनही देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरी क्षेत्रासंदर्भातील कायद्याचे पालन करण्यास वचनबद्ध असल्याची ग्वाहीदेखील देण्यात आली. इजिप्त, ग्रीस व सायप्रसने दिलेले संयुक्त निवेदन तुर्कीवरील दबाव वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणार्‍या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनात केले होतेे. त्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी तुर्कीने या भागात सातत्याने युद्धसरावही केले होते.

भूमध्य सागरी

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही हालचालींना वेग दिला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ग्रीसने अमेरिका, फ्रान्स तसेच युएईबरोबर स्वतंत्ररित्या संरक्षण सराव केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात भूमध्य सागरी क्षेत्रात झालेल्या बहुराष्ट्रीय सरावात इजिप्त, सायप्रस, फ्रान्स व संयुक्त अरब अमिरात (युएई) हे देशही सहभागी झाले होते. या सरावात सौदी अरेबिया निरीक्षक देश म्हणून सहभागी झाला होता. या घटना ग्रीसकडून तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी सहकारी देशांबरोबर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

दुसर्‍या बाजूला तुर्कीचे भूमध्य सागरी क्षेत्रासह आफ्रिकेतील वाढते वर्चस्व इजिप्तसारख्या देशांना चांगलेच खटकणारे ठरते आहे. त्यामुळे तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी इजिप्तने तुर्कीचे प्रतिस्पर्धी असणार्‍या देशांशी सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यात इस्रायल, युएई, ग्रीस यासारख्या देशांचा समावेश आहे. इजिप्त व ग्रीसने गेल्या वर्षी भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनक्षेत्रासंदर्भात करारही केला होता. त्यानंतर इजिप्त व ग्रीसच्या नेतृत्त्वात सातत्याने चर्चा सुरू असून तुर्कीविरोधातील आघाडी मजबूत करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. शनिवारी झालेली बैठक त्याचाच भाग मानला जातो.

leave a reply