देशाची परकीय गंगाजळी विक्रमी ५५५ अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली/मुंबई – अवघ्या एक आठवड्यात देशाच्या परकीय गंगाजळीत साडेतीन अब्ज डॉलर्सहून अधिक भर पडली असून, ती विक्रमी ५५५ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात परकीय गंगाजळीत तब्बल ८० अब्ज डॉलर्सने वाढ झाली असून, वर्षभरात ११५ अब्ज डॉलर्सची भर पडल्याचे समोर आले आहे. तेल व सोन्याची घटलेली आयात, निर्यातीचा वाढता टक्का आणि परकीय गुंतवणुकीतील सातत्य हे घटक परकीय गंगाजळीत होणाऱ्या अभूतपूर्व वाढीस कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते.

देशातील परकीय गंगाजळी विक्रमी ५५५ अब्ज डॉलर्सवर‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १६ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळी ५५५.१२० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली आहे. ९ ऑक्टोबर रोजी परकीय गंगाजळीने ५५० अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडली होती. त्यानंतर सात दिवसात त्यात ३.६१५ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. या वाढीत परकीय चलनाचा वाटा ३.५३९ अब्ज डॉलर्सचा असून सोन्याच्या राखीव साठ्यांच्या मूल्यात ८.६ कोटी डॉलर्सची भर पडली आहे.

देशातील परकीय गंगाजळी विक्रमी ५५५ अब्ज डॉलर्सवरसध्या चीन, जपान, स्वित्झर्लंड व रशियानंतर सर्वाधिक परकीय गंगाजळी असलेला भारत हा पाचवा देश आहे. जगभरातील अर्थव्यवस्था कोसळत असताना भारताकडे परकीय चलनाचा ओघ सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात इंधन तसेच सोन्याची मागणी कमी झाल्याने आयात घटली असून, देशाचा आयातीवर होणारा खर्चही कमी झाला आहे. त्याचवेळी परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत. रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परकीय गंगाजळीत ८.४२ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन देशाकडील परकीय गंगाजळीचा साठा प्रथमच ५०० अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. अर्धा ट्रिलियन डॉलर्सहून अधिक झालेल्या देशाच्या परकीय गंगाजळीच्या साठ्याकडे ऐतिहासिक घटना म्हणून पाहण्यात आले होते. ९०च्या दशकात भारताकडील हा परकीय चलनाचा साठा जवळजवळ शून्यावर पोहोचला होता. त्यामुळे भारतावर सोने गहाण ठेवण्याची वेळ ओढवली होती.

leave a reply