चीन सोडून इतर आशियाई देशांमध्ये गुंतवणूक करा – चॅन्सेलर मर्केल यांचा चीनला धक्का

बर्लिन – जर्मन कंपन्यांनी चीन सोडून इतर आशियाई देशांमध्ये गुंतवणूक करावी, या शब्दात जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी चीनच्या युरोपमधील इराद्यांना दणका दिला आहे. चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी व्यापाराच्या मुद्यावरून चीनला सुनावण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. ‘जर यापुढे युरोपियन कंपन्याना चीनमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली नाही, तर चिनी कंपन्यांनाही युरोपच्या बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही, याची चीनच्या राजवटीने जाणीव ठेवावी’, असा इशारा जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी दिला होता.

मर्केल

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर, युरोपातही चीनविरोधातील असंतोष तीव्र होत आहे. कोरोनाच्या साथीची चीनच्या सत्ताधारी राजवटीने केलेली हाताळणी आणि त्याचवेळी हॉंगकॉंग तसेच उघुरवंशीयांबाबत घेतलेले निर्णय युरोपमधील नाराजीचे प्रमुख कारण ठरले आहे. चीनबरोबरील संबंधांच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघाने दिलेले इशारे तसेच आवाहनही चीनने धुडकावून लावल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर युरोपमधील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांनी चीनला धक्का देणारे वक्तव्य करणे महत्त्वाचे ठरते.

जर्मनीत नुकतीच ‘आशिया-पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चॅन्सेलर अँजेला मर्केल व वाणिज्य मंत्री पीटर अल्टमायर उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी, जर्मन कंपन्यांनी आशियाई बाजारपेठेचा विचार करताना चीन सोडून इतर देशांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. ‘जर्मनीकडून आशियात होणाऱ्या निर्यातीपैकी तीन चतुर्थांश निर्यात पूर्व आशियात व त्यातील ५० टक्के चीनमध्ये होते. यापुढे जर्मन कंपन्यांनी इतर आशियाई देशांमध्ये गुंतवणूक करावी व आशिया-पॅसिफिक क्षेत्रात नव्या बाजारपेठांकडे लक्ष द्यावे. जर्मन सरकार त्यासाठी योग्य सुधारणा करून आवश्यक चौकट तयार करेल’, या शब्दात चॅन्सेलर मर्केल यांनी जर्मन उद्योगांनी चीनमधून बाहेर पडण्याची तयारी करावी, असे सूचक संकेत दिले.

मर्केलवाणिज्य मंत्री पीटर अल्टमायर यांनीही जर्मन कंपन्यांनी आशियाई बाजारपेठेतील गुंतवणूक वाढविताना चीनच्या पलीकडे विचार करावा, असे आवाहन केले. काही दिवसांपूर्वीच जर्मनीने नवे इंडो-पॅसिफिक धोरण जाहीर केले असून, त्यातही व्यापार व गुंतवणुकीसंदर्भात नव्या देशांचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

सध्या महासंघाचे अध्यक्षपद जर्मनीकडे असून युरोपिय कमिशनच्या प्रमुख पदीही जर्मन नेत्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे महासंघाची धोरणे व निर्णयांमध्ये जर्मनीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी चीनसाठी युरोपिय बाजारपेठ खुली करण्यात आणि युरोप व चीनमधील संबंध दृढ करण्यात जर्मनीने पुढाकार घेतला होता. त्यामुळे आता चॅन्सेलर अँजेला मर्केल व इतर नेत्यांनी चीनविरोधात नाराजी दर्शविणारी उघड वक्तव्ये करणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. याचे मोठे परिणाम युरोप व चीनमधील संबंधावर होण्याची शक्यता असून, चीनच्या महत्त्वाकांक्षांना जबरदस्त धक्का बसू शकतो.

leave a reply