अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले

पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये मुसळधार पाऊस

कोलकाता. भुवनेश्वर,  (वृत्तसंस्था) –  गेल्या २१ वर्षातील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले सर्वात भीषण ‘अम्फान’ चक्रीवादळ बुधवारी दुपारी बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी १९०  किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घराचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असून सुरक्षेच्या करणास्तव लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने  मोठी जीवितहानी टळली आहे. आतापर्यंत ३ जणांचा या चक्रीवादळात आणि मुसळधार पावसात बळी गेल्याचे समोर येत आहे.

पश्चिम बंगालच्या दिघापासून ६७० कि.मी. आणि ओडिशातील पारदीपपासून ५२० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अम्फान चक्रीवादळ अखेर बुधवारी बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळामुळे  मंगळवारपासूनच ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाली होती. बुधवारी दुपारी  २.३० वाजता चक्रीवादळ  पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हटिया बेट पार केले. चक्रीवादळामुळे किनारपट्टीजवळच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झाडे उन्मळून पडली आहेत. तर विजेच्या खांबाचे नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. 

दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये कमीतकमी ६.५८ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चक्रीवादळामूळे पश्चिम बंगालमध्ये आतपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. हावडा येथे एक १३ वर्षाच्या मुलीच्या अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला. तर उत्तर २४ परंगणामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी १६० ते १७० किमी इतका होता. त्यानंतर त्याचा वेग वाढला. वादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाने झोडपले आहे.

ओडिशातून पाच लाख, तर पश्चिम बंगालमधून १,५८,६४० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते,असे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे (एनडीआरएफ) प्रमुख एस. एन. प्रधान म्हणाले. एनडीआरएफची २० पथके ओडिशात तैनात करण्यात आली असून १९ पथके पश्चिम बंगालमध्ये तैनात आहेत. तसेच, दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत, असे प्रधान म्हणाले.

leave a reply