कोरोनाने घडविलेल्या हानीचा जगाला अंदाज आलेला नाही

- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘कोरोनाच्या साथीने घडविलेल्या हानीचा अजूनही पुरता अंदाज आलेला नाही. अशा परिस्थितीत कोरोनाकडे इतर आव्हानांपैकी एक म्हणूून पाहिले जाऊ नये. तर पुन्हा पुन्हा उद्भवणारे संकट म्हणून या साथीकडे पहायला हवे. अशा परिस्थितीत या जागतिक आव्हानाला तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवरील एकजूट अत्यावश्‍यक आहे’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले. त्याचवेळी कोरोनाच्या साथीमुळे जागतिक पुरवठ्याची विश्‍वासार्ह साखळी उभारण्यासाठी जपान व ऑस्ट्रेलियासह भारत पुढाकार घेत असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोनाच्या काळातही भारताने उद्योग, कृषी, कामगार व शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणा घडविल्या, याकडेही परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाने घडविलेल्या हानीचा जगाला अंदाज आलेला नाही - भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर‘फ्युचर ऑफ एशिया’ या ‘निक्केई’ने आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बोलत होते. यावेळी जयशंकर यांनी कोरोनाच्या साथीचे जबरदस्त आव्हान भारतासमोर खडे ठाकलेले आहे, हे मान्य केले. तसेच या आव्हानाचा सामना करण्यासाठी कितीही मोठ्या देशाची क्षमता पुरेशी ठरणार नाही, हे जागतिक पातळीवरील आव्हान आहे, असे जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. म्हणूनच कोरोनाच्या साथीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य अत्यावश्‍यक ठरते, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. तसेच कोरोनाच्या संकटामुळे काही गोष्टींवर गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

संकटांनी बाधित होणार नाही, अशी विश्‍वासार्ह पुरवठा साखळी विकसित करून जागतिक अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्याच्या दिशेने भारत, जपान व ऑस्ट्रेलियाचे सहकार्य सुरू झाले आहे. आरोग्य क्षेत्रासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टींचा जागतिक पुरवठा सुनिश्‍चित करायचा असेल, तर कोरोनाच्या साथीचे जागतिक आव्हान प्रगल्भतेने समजून घेण्याची गरज आहे. हे कार्य राष्ट्रीय पातळीपुरता विचार करून होणारे नाही, त्यासाठी विशेष आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज भासेल, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. स्पष्टपणे उल्लेख केला नसला तरी कोरोनाची लस बुद्धिसंपदा कायद्यातून वगळण्यास नकार देणाऱ्या अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देशांना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी कोरोनाची साथ आल्यानंतर चीनचे उत्पादनक्षेत्र मंदावले होते व त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला होता, या समस्येचाही उल्लेख परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला. म्हणूनच जागतिक पुरवठा साखळीचे अधिक विश्‍वासार्ह केंद्र म्हणून भारत जगासमोर येत आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधल्याचे दिसत आहे.

leave a reply